Nashik Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज जनजातीय गौरव तथा आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी दुपारी नाशिकला (Nashik) येत असून या दौऱ्यात सुहास कांदे (Suhas Kande) हजेरी लावणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान सुहास कांदे यांची नाराजी दूर झाली आहे का? असा प्रश्न खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना विचारताच, "दौऱ्यात मी उपस्थित राहणार आहे पण बाकी कोण कुठे असणार हे माहित नाही," असं उत्तर त्यांनी दिलं. तसंच "पालकमंत्री दादा भुसे सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करत आहेत, कांदे यांची नाराजी जरी असली तरी आम्ही एकत्र राहून काम करु," असं त्यांनी म्हटलं. 


सुहास कांदेंची पत्रकार परिषदेत दादा भुसे, हेमंत गोडसेंविषयी उघड नाराजी
नाशिकमधील नांदगाव मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे कमालीचे नाराज असून गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्याकडेही त्यांनी पाठ फिरवली होती. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी कांदे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याच पक्षाचे नेते दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसेंविषयी उघड नाराजी व्यक्त केल्याने राज्यात हा चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान या विषयावर भुसे आणि गोडसे यांनी चुप्पी साधलेली असतानाच खासदार हेमंत गोडसे यांची पहिली प्रतिकिया एबीपी माझाच्या हाती आली आहे. 


सुहास कांदे यांची नाराजी असली एकत्र राहून काम करु : हेमंत गोडसे
"मुख्यमंत्री नाशिकमध्ये येणार आहेत. मी उपस्थित राहणार आहे पण बाकी कोण कुठे असणार हे माहित नाही. सुहास कांदे यांच्या नाराजीचा काही भाग नव्हताच, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की बाळासाहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत. त्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. पालकमंत्री दादा भुसे सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करत आहेत. त्यामुळे सुहास कांदे यांची नाराजी जरी असली तरी आम्ही एकत्र राहून काम करु. दादा भुसे, सुहास कांदे असे आम्ही एकाच परिवारातील आहोत, नाशिकच्या विकासासाठी प्रयत्न करु," असं हेमंत गोडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं. 


सुहास कांदे यांची नाराजी का? 
आमदार सुहास कांदे हे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. छगन भुजबळ यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या वादामुळे ते चर्चेत आले. तर दुसरीकडे नाशिकमधून शिंदे गटात जाणारे पहिले नेते होते. त्यानंतर दादा भुसे, नंतर खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटात उडी घेतली. मात्र या सर्वांत दादा भुसे यांना मंत्रिपद मिळालं. यानंतर हेमंत गोडसे यांनी शहरासह जिल्ह्यात अनेकांना शिंदे गटाची मनसुबदारी सोपवली. त्यामुळे कांदे एकटे पडले. पक्ष निर्णयात मत घेत नसल्याचे, तसेच बैठकांना बोलावलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. 


संबंधित बातमी