Shinde Group Dasara Melava : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचा (Shinde Group) दसरा मेळावा कुठे होणार या वादावर पडदा पडल्यानंतर, कोणाच्या गटाला सर्वाधिक गर्दी होणार याची चर्चा सुरु आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मैदानात होणार आहे. आता या मेळाव्याचं पोस्टर एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. "आम्ही विचारांचे वारसदार" असा उल्लेख पोस्टरवर करण्यात आला आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो पोस्टरवर आहेत. तसंच पोस्टरवर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह देखील आहे.


हिंदुत्त्वाचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार दसरा मेळाव्यात मांडणार असल्याच शिंदे गटाकडून सुरुवातीपासून सांगितलं जात होतं. छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाच्या विचारांचे वारसदार असल्याचं शिंदे गटाच्या या पोस्टरमधून सांगण्यात आलं आहे.
 
धनुष्यबाण हे चिन्हं कोणाचं यावरुन चर्चा सुरु आहे. निवडणूक आयोग यावर निर्णय देणार आहे. तर आपणच खरी शिवसेना असून धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल, असं एकनाथ शिंदे सातत्याने आपल्या आमदारांना सांगत आहेत. त्याच अनुषंगाने हे चिन्ह देखील पोस्टरवर पाहायला मिळत आहे. याशिवाय डरकाळी फोडणारा वाघाचं चित्र देखील पोस्टरवर असून हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार, असं घोषवाक्य देखील लिहिलं आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात हिंदुत्त्वाचा मुद्दाच प्रमुख असणार आहे.


...म्हणून पोस्टरवर हिंदुत्वाचे वारसदार असं लिहिलं : नरेश म्हस्के
दसरा मेळावा आणि पोस्टरविषयी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले की, "हिंदुत्ववादी विचारसरणीचं सोनं लुटण्यासाठी शिवतीर्थावर या!, अशी बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची टॅगलाईन होती. हेच विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलं आहे. महाविकास आघाडीसोबत सत्तेत बसलो होतो तेव्हा हिंदुत्व विसरलो होतो. मविआमध्ये असताना शिवसेनाप्रमुखाना हिंदुहृदयसम्राट म्हणायला आम्हाला लाज वाटत होती. महाविकास आघाडीविरोधात शिंदे यांनी उठाव केला आहे. त्यामुळे आम्हीच खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे वारसदार असं या पोस्टरवर लिहिलं आहे." तसंच ठाकरे गटाचा दसरा शिवाजी पार्कवर होणार आहे. जास्तीत जास्त गर्दी जमवण्याचा दोन्ही गटांचा प्रयत्न आहे. याविषयी विचारलं असता नरेश म्हस्के म्हणाले की, "शिवाजी पार्कची क्षमता किती तर 30 ते 40 हजार आहे. आमच्याकडे त्यापेक्षा दहापटीने कार्यकर्ते येतील. 


VIDEO : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं पोस्टर 'एबीपी माझा'च्या हाती