मुंबई: राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. 2022 साली शिवसेना पक्ष फुटला, एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदार आणि खासदार यांना सोबत घेऊन बंड केलं आणि आपणच खरी शिवसेना असल्याचं सांगितलं आणि राज्याचं राजकारण बदललं, राज्यात सत्तातंर झालं. या सर्व घडामोडीमध्ये महत्त्वाची जबाबदारी होती ती भाजप नेते आणि नुकतेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले रवींद्र चव्हाण यांच्यावरती...आज एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी त्या सर्व घडामोडींबद्दल भाष्य केलं आहे. 2022 मध्ये जे ऑपरेशन शिंदे झालं त्यामध्ये आपला रोल महत्त्वाचा होता, पण तो नक्की काय होता ते सांगा, या प्रश्नावरती उत्तर देताना चव्हाण म्हणाले, त्यावेळी या सर्व विषयांमध्ये विशेष लक्ष घालून काम करावं त्यावेळी पक्षाला वाटलं देवेंद्र फडणवीसांना वाटलं. त्यावेळी त्यांनी मला जबाबादारी दिली होती. ते सर्व यशस्वी होण्याकरता जे जे प्रयत्न करावे लागले ते मी प्रामाणिकपणे केले. 

Continues below advertisement


ते निमित्त म्हणून मी होतो


पुढे चव्हाण म्हणाले, एकनाथ शिंदे यांचे आणि माझे गेली अनेक वर्षे अतिशय चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे सहजपणे करता येऊ शकतं सगळं त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावरती सोपवली. त्या काळात जे आवश्यक आहे ते मी केलं. भेटीगाठी करणं, बैठका, दोघे एकत्र भेटू शकत नव्हते, तेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता कोणाला भेटला काय किंवा नाही काय याकडे दुर्लक्ष होत होतं, गेली अनेक वर्षे आम्ही सोबत काम केलं होतं त्यामुळं भेटलं, बोलणं होतं. ते कोणाला लक्षात येणार नाही असं वाटलं, आणि तसंच झालं, कोणाच्या लक्षात आलं नाही. बराच वेळ हे सुरू होतं. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एक धोरण आखलं, त्यातला एक पार्ट किंवा गोष्टी घडवून आणण्यासाठी एक निमित्त लागतं, ते निमित्त म्हणून मी होतो, असंही पुढे चव्हाण म्हणाले.


मी अस्वस्थ झालो, डोळ्यात पाणी होतं


हे सर्व झालं त्यानंतर राज्यपालांकडे तुम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे पत्र द्यायला गेलात तेव्हा पत्र दिलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे ठरलं राज्यासाठी तो धक्का होता, त्यावेळी सर्वांनाच वाटलं होतं, फडणवीस मुख्यमंत्री होणार पण तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होणार हे ठरल्यानंतर आपण आपली गाडी न घेता पायी कुठेतरी निघून गेलात आणि कुठे गेलात हे कोणाला माहिती नव्हतं, नक्की काय घडलं होतं तेव्हा? या प्रश्नावरती उत्तर देताना रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं, तसंच एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला देखील तेच वाटलं होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. मी गोव्यावरून इकडे आलो होतो. त्यामुळे माझ्याकडे माझी गाडी नव्हती. त्यामुळे ज्या गाडीतुन आम्ही एअरपोर्टवरून त्या ठिकाणी गेलो होतो, तिथे राज्यपालांच्या इथे गेल्यावर मला समजले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत. हे कोणालाही माहिती नव्हतं,  कदाचित फडणवीसांना हे माहित असेल. मला हे माहिती झालं तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून मला अतिशय दु:ख वाटलं, त्यावेळी मी तिथून बाहेर पडलो, अतिशय मोठा पाऊस पडत होता. मी अस्वस्थ झालो, डोळ्यात पाणी होतं, त्यानंतर चालत चालत नाक्यापर्यंत गेलो. तिथे टॅक्सी पकडली, ट्रेनमध्ये बसलो आणि घरी गेलो, असा त्यावेळचा किस्सा देखील रवींद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितला आहे.


कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला वाटतं, आपण आपल्या पक्षासाठी काम करतो, नेत्यासाठी करतो, त्यामुळे आम्हाला वाटलं होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत पण तसं झालं नाही, आमचा अपेक्षाभंग झाला, त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, मला वाईट वाटलं त्यामुळं मी चालत कुर्ल्याला गेलो, मला घरातून फोन आला फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, मी कुठे आहे ते विचारलं मी सांगितलं घरी येतोय, त्यानंतर परत फडणवीसांचा फोन आला, नंतर मी एकनाथ शिंदेंसोबत गोव्याला गेल्याचंही यावेळी चव्हाण यांनी सांगितलं.