पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसात बिबट्याचे हल्ले (Leopard Attack) वाढल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आता तोडगा म्हणून शरद सोनवणे यांनी भलतीच मागणी केली आहे. वाढत्या हल्ल्यांवर उपाय म्हणून बिबट्याची नसबंदी करा, अशी मागणी शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांनी केली आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात बुधवारी एका चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्याचत मृत्यू झाला. यानंतर शरद सोनवणे यांनी भरसभेत बिबट्यांच्या नसबंदीची मागणी केली आहे.
बिबट्याची नसबंदी करण्याची शरद सोनवणेंची भरसभेत मागणी
जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले वाढत असताना शेतकरी भितीच्या छायेखाली आहेत. एकतर बिबट्याचा बंदोबस्त करा अन्यथा आम्हाला तुमच्या सोबत घेऊन जा, असं म्हणत माजी आमदार शरद सोनवने बिबट्याची नसबंदी करण्याची थेट मागणी भर सभेतून केली आहे.
बिबट्याचे हल्ले थांबावेत यासाठी पाऊलं उचलणार : अजित पवार
बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या मुलाला अजित पवारांन श्रद्धांजली वाहिली. बिबट्याचे हल्ले थांबावेत, त्याअनुषंगाने पावलं उचलायला हवेत, ही वस्तुस्थिती आहे. सरकार याबाबत विचार करेल. शिरूर मतदारसंघात ओतूर मार्केटमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी सभा घेतली.
एखाद्याचा जीव जायला नको : अजित पवार
अजित पवारांनीही बिबट्याच्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचे जीव गेलेत, एखाद्याचा जीव जायला नको. यासाठी पिंजरे लावण्याची गरज आहे. दिवसा वीजपुरवठा व्हावा, यासाठी मी पाठपुरावा करेन. वीज रात्रीऐवजी दिवसा द्यायला हवी. याबाबत पाठपुरावा करत राहीन. पण बिबट्याच्या बाबतीत राजकारण कसं काय करतात. ते खासदार तर नुसती डायलॉग बाजी करतात, असं म्हणत अजित पवारांनी टीका केली आहे.
आठ वर्षीय मुलावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रुद्र फापाळे असं मृत मुलाचं नाव आहे. रुद्र सकाळी घरासमोरील अंगणात खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत त्याला उसाच्या शेतात ओढून नेलं, या हल्यात रुद्रचा जागीच मृत्यू झालाय, मामाच्या गावच्या यात्रेसाठी आलेल्या रुद्रवरती बिबट्याने हा हल्ला करत त्याचं पोट फाडत त्याला ठार केलं. रोहिदास काकडे या आपल्या मामाकडे यात्रेसाठी रुद्र आला होता. मात्र, बिबट्या त्याचा काळ बनून आला.