पुणे मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे (Vasant More MNS) यांनी मनसेचा राजीनामा  (Pune Vasant More Resignation) दिला आहे. अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा, अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी राजीनामा जाहीर केला आहे. त्यांनी ऐक लोकसभेच्या निवडणुका तोंडावर राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackray) यांनी राज्यातील मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला वसंत मोरेंनी विरोध केला होता. त्यानंतर त्यांची शहराध्य़क्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मनसेचे वरिष्ठ त्यांना प्रत्येक वेळी डावलत आहेत, अशी त्यांनी खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी 'मी राज साहेबांसोबत आहे', असं अनेकदा सांगितलं होतं. मात्र स्थानिक गटबाजीमुळे आणि पक्षाने वारंवार डावलल्यामुळे त्यांनी थेट राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या विरोधात घेतलेली भूमिका, भोंग्यांना विरोध आणि वरिष्ठांकडून मिळणारी वागणूक, हे वसंत मोरेंच्या राजीनामाचे ट्रिगर पॉईंट असल्याचं बोललं जात आहे. 


मशिदिवरील भोंग्याला विरोध


2022 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केलं होते.  मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याचं दिसून आलं. काही कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले होते. राज ठाकरेंच्या याच मुद्याला वसंत मोरेंनीदेखील विरोध केला होता. माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा लावणार नाही. सोबतच राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचेही त्यांनी म्हटले. आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. परंतु, सध्या रमजान सुरु असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही, अशी स्पष्ट भूमिका वसंत मोरेंनी घेतली होती.  


भोंग्याच्या निर्णयाला विरोध केल्यामुळे मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं. त्यानंतर वसंत मोरेंची शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी पुण्यातील काही नेत्यांनी मुंबईला बोलवून घेतलं होतं. त्यावेळी वसंत मोरेंना डावललं होतं. त्यानंतर साईनाथ बाबर यांना शहराध्यक्ष पद दिलं होतं. त्यानंतर पुण्यातील मनसेच दोन गट पडल्याचं समोर आलं आणि मनसेमधील अनेक अंतर्गत वाद वारंवार चव्हाट्यावर आले. 


पुण्यात राज ठाकरेंच्या अनेक कार्यक्रमावेळीदेखील त्यांना पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनी डावललं, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांना वरिष्ठ नीट  वागणूक देत आहेत. ते खरंच राज ठाकरेंसोबत आहेत का? असे प्रश्न त्यांना वरिष्ठांकडून वारंवार विचारण्यात येत होते. मात्र वसंत मोरेंनी वारंवार 'मी राज साहेबांसोबत आहे', असं ठामपणे सांगितलं. मात्र मनसेतील नाराजी नाट्य आणि अंतर्गत वाद कायम चर्चेत आले. अखेर या सगळ्याला कंटाळून राजीनामा दिल्याचं वसंत मोरेंनी सांगितलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


 Vasant More : राज ठाकरेंची पुण्यातील ताकद, मनसेचे फायरब्रँड नेते, पक्षाला 'जय महाराष्ट्र', कोण आहेत वसंत मोरे?