अहमदनगर: राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. ही प्रचारसभा भाषणांपेक्षा निलेश लंके (Nilesh Lanke) यांचा साधेपणा आणि स्वत:च्या वाट्याला आलेलं सर्वकाही कार्यकर्त्यांवर ओवाळून टाकण्याच्या प्रकारामुळे जास्त गाजली. या प्रचारसभेसाठी शरद पवार (Sharad Pawar), आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. सभेवेळी व्यासपीठावर मान्यवरांची गर्दी झाल्यामुळे बसण्यासाठी खुर्च्या अपुऱ्या पडल्या. तेव्हा निलेश लंके यांनी आपण लोकसभेचे उमेदवार आहोत, आपल्यासाठी ही प्रचारसभा घेतली जात आहे, याची कोणतीही तमा न बाळगता थेट जमिनीवर बसकण मारली. सभेत इतर वक्त्यांची भाषणं सुरु असताना निलेश लंके स्टेजच्या एका कोपऱ्यात खाली मांडी घालून बसले होते. सभेतील या दृश्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा राहिली. 


या सभेत शरद पवार हे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनीही विरोधकांचा समाचार घेण्यासोबत निलेश लंके यांच्या साधेपणाविषयी भाष्य केले. सुजय विखे यांनी मध्यंतरी निलेश लंके यांना इंग्रजी येत नसल्याचा उल्लेख केला होता. त्यावर शरद पवार यांनी सांगितले की, संसदेत कोणत्याही भाषेत बोलण्याचा अधिकार आहे. मी अनेकदा संसदेत इंग्रजी, हिंदी आणि अगदी मराठीतही प्रश्न मांडले आहेत. तुमच्या भाषणाचं शब्दश: हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर केलं जाते, असे शरद पवार यांनी आवर्जून सांगितले. यानंतर पवारांनी म्हटले की, निलेश लंके आणि राणी लंके यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. मी त्यांच्यासाठी फुलं आणली पण निलेश लंके यांनी ती फुलं दुसऱ्यालाच देऊन टाकली. निलेश लंके यांचा स्वभाव असाच आहे. ते स्वत:साठी काही ठेवायचे नाही, दुसऱ्याला देऊ टाकायचे, या वृत्तीचे आहेत. मी राणी लंके यांचे आभार मानतो की, त्यांनी असा नवरा सांभाळला, जो अखंडपणे जनतेत राहतो. 


निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटातून बाहेर पडत शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशात अमोल कोल्हे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. निलेश लंके यांच्या रुपाने शरद पवार यांनी अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे-पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे.


आणखी वाचा


निलेश लंके पाठांतर करुन माझ्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलले तर नगरमधून उमेदवारी मागे घेईन: सुजय विखे