मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार रोहित पवार यांच्याकडूनही अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील आमदार पुन्हा शरद पवारांकडे (Sharad Pawar) येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. या चर्चेला अजित पवार गटाकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. मात्र, आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडून तसा दावाही केला जातो. आता, शरद पवार यांनीही याबाबत थेट भाष्य केलं आहे. पक्ष सोडून गेलेले लोक मला भेटत नाहीत, पण ते जयंतरावांना भेटतात असा गौप्यस्फोटच शरद पवारांनी केला आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर होते, साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेला त्यांनी भेट दिली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावर भाष्य करत पत्रकारांच्या प्रश्नांन उत्तरे दिली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाकडी बहीण योजनेचं स्वागत करताना, या योजनेच्या अंमलबजावणीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर, तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाताली काही नेते उत्सुक असल्याच्या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं. ''माझ्या संपर्कात कोणीही नाही, मी त्याच्यात लक्षही देत नाही. पण, जयंत पाटील यांना ते लोकं भेटतात याची माहिती मला आहे. त्याच्यावर आऊटकम काय येईल हे उद्याचं मतदान झाल्यावर कळेल,'' असेही पवार यांनी म्हटले. 



योजनेची अंमलबजावणी कशी करणार?


राज्य सरकारने योजना जाहीर केल्या, पण माझा अनुभव आहे की अंदाजपत्रक मांडल्यानंतर 6 महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात. पण, इथं केवळ 8 दिवसात पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत. शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर दिसतं. मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे, पण संपूर्ण राज्यात ही योजना पार पाडता येईल का? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. 


पक्ष व चिन्हावर पुढील आठवड्यात सुनावणी


आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी या चिन्हामुळे फटका बसला, विशेष म्हणजे सातारा लोकसभा मतदार संघात देखील आम्हाला या निवडणूक चिन्हांच्या साधर्मतेचा फटका बसला आहे. सध्या आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे, आम्ही स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह वेगळी भूमिका घेतलेल्या लोकांना देण्यात आलं. हे सगळं प्रकरण कोर्टात आहे, पुढील आठवड्यात त्याची सुनावणी आहे, अशी माहितीही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली. तसेच, पक्षासाठी स्वखुशीने देणगी स्वीकारण्याचा दिलेला निर्णय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.


विधानसभा निवडणुकीवरही भाष्य


लोकसभा निवडणुकीतील निकाल म्हणजे नरेंद्र मोदी यांचा देश चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न जनतेनं हाणून पाडला आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील अशाच पद्धतीने जनता निर्णय घेईल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला. 


वाघनखांवरुन पवारस्टाईल टोला


इंद्रजीत सावंत यांच्या इतिहासातील कामाची मला कल्पना आहे, इतिहासामध्ये त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं योगदान आहे. मी काही इतिहासाचा जाणकार नाही. मात्र, यातील जाणकारांचं मत एकदम दुर्लक्षित करू नये, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन असलेल्या वादावरही शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करत सरकारला पवारस्टाईलने टोला लगावला.