मुंबई: समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे सरकारी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी या महामार्गाच्या बांधणीसाठी देण्यात आलेल्या कंत्राटांच्या माध्यमातून तब्बल 3000 कोटी रुपयांची आर्थिक माया जमवली असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. राधेश्याम मोपलवार हे आजघडीला देशातील श्रीमंत सरकारी अधिकारी म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान मोदी यांनीही राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांच्यावर कारवाई करा, असे सांगितले होते. मात्र, 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तात्पुरती कारवाई करुन त्यांच्यावर नंतर मोठी जबाबदारी दिली. मोपलवार निवृत्त झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉररुमचे प्रमुख आहेत, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


यावेळी रोहित पवार यांनी राधेश्याम मोपलवार यांच्या संपत्तीचा उल्लेख केला. राधेश्याम मोपलवार यांची भारतात आणि भारताबाहेर 3000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 4 महिन्यात पुन्हा टेंडर काढण्यात आले, त्यामध्ये वाढीसाठी मंजुरी देण्यात आली. तेव्हा हे टेंडर 55 हजार कोटीवर गेले. त्यामुळे समृद्धी सामान्य माणसाची झाली की अधिकाऱ्यांची झाली, हे कळून येते,  असे रोहित पवार यांनी म्हटले.


मोपलवारांच्या दोन बायका आणि दोन मुलींकडे किती संपत्ती?


समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक 11 चे काम गायत्री प्रोजेक्टला देण्यात आले. हे टेंडर 1900 कोटी रुपयांचे होते. 2021  साली गायत्री प्रोजेक्टने हे काम जमणार नाही, असे सांगितले. त्यानंतर हेच काम हुजूर मल्टी प्रोजेक्टला देण्यात आले. ही हुजूर मल्टी प्रोजेक्ट कंपनी कोणाची,याच्या खोलात गेले पाहिजे. या कंपनीत एकूण 1 कोटी 52 लाख समभाग आहेत. यापैकी 23 लाख समभाग हे मोपलवार कुटुंबीयांकडे आहेत. राधेश्याम मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार हिच्याकडे हुजूर मल्टीप्रोजेक्ट कंपनीचे 3 लाख 98 हजार समभाग आहेत. तर सदानंद मोपलवार यांच्याकडे 23 हजार 645 समभाग आहेत. तर हुजूर मल्टीप्रोजेक्टचे 4 लाख 98 हजार समभाग असणारी मेलोरा इन्फ्रा कंपनी ही तन्वी मोपलवार यांची आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.


राधेश्याम मोपलवार यांच्या स्वत:च्या नावावर 1500 कोटींची मालमत्ता आहे. मोपलवारांच्या दुसऱ्या बायकोकडे 150 कोटी, तिसऱ्या बायकोकडे 300 कोटींची संपत्ती आहे. तर मोपलवार यांच्या पहिल्या मुलीकडे 500 कोटी आणि दुसऱ्या मुलीकडे 350 कोटी रुपये आणि त्यांचा भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे 200 कोटी रुपयांची संपत्ती आहे. हा एकत्रित आकडा 3000 कोटींच्या घरात जातो, असे रोहित पवार यांनी म्हटले.


आणखी वाचा


राधेश्याम मोपलवार यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती, पायाभूत सुविधा प्रकल्प वार रुमच्या महासंचालकपदाची जबाबदारी