Sharad Pawar PC : "आपला पक्ष पुढे कसा जाणार हे आमच्या सहकाऱ्यांना माहित आहे. आम्ही काय करतो, त्यात आम्हाला समाधान आहे, ते लिहितील त्यांना लिहायचा अधिकार आहे. आमच्या दृष्टीने त्याला महत्त्व नाही," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'सामना'तील अग्रलेखावर (Saamana Editorial) भाष्य केलं. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रवीदाचं पार्सल या टीकेला तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या 'राष्ट्रवादी ही भाजपची टीम बी' आरोपांनाही उत्तर दिलं.


'सामना'तील टीकेबाबत शरद पवार काय म्हणाले?


पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले अशी टीका 'सामना'तील अग्रलेखात करण्यात आली होती. त्यावर शरद पवार म्हणाले की, "आम्ही काय केलं हे त्यांना माहित नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही पक्षातील सहकारी अनेक गोष्टी बोलतो, वेगवेगळी मतं व्यक्त असतात. पण बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी करत नाही. हा आमच्या घराचा प्रश्न आहे. घरामधील सहकाऱ्यांना ठावूक आहे की आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. उद्या नवीन नेतृत्त्वाची फळी या पक्षात कशी तयार केली जाते याची खात्री पक्षातील सगळ्या सहकाऱ्यांना आहे. याचं उदाहरण देतो. 99 साली आम्ही राज्यात सत्तेवर आलो, त्यावेळी मंत्रिमंडळ करायचं होतं. काँग्रेस आणि आमचं संयुक्त मंत्रिमंडळ होतं. त्यावेळी त्या नव्या मंत्रिमंडळात ज्या सहकाऱ्यांना आम्ही सहभागी करुन घेतलं, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आर आर पाटील यांच्यासह अनेक नावं होती, ज्याच्या आयुष्यातील सत्तेची पहिली टर्म होती. आता जी नावं घेतली त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती केली होती. महाराष्ट्राने बघितलं आहे की त्यांनी आपल्या कर्तृत्त्व दाखवलं आहे. त्यामुळे आम्ही तयार करतो की करत नाही, हे तुम्ही लिहिलं याचं मात्र आमच्या दृष्टीने काही नाही. ते लिहितील, त्यांचा लिहायचा अधिकार आहे. आम्हाला ठावूक आहे आम्ही काय करतो आणि त्यात आम्हाला समाधान आहे. 


कुरबुरींचा महाविकास आघाडीवर परिणाम नाही


गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कुरबुरी पाहायला मिळत आहेत. परंतु या टीकेचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही, असं शरद पवार म्हणाले. "वेगवेगळी मतं असतात. पण त्यामुळे आमच्यात गैरसमज नाहीत," असं शरद पवार यांनी म्हटलं.


देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका


राष्ट्रवादीचं पार्सल पुन्हा महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर शरद पवार म्हणाले की, "काही लोकाचं वैशिष्ट्य असं की काही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करायचा."


पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षातील स्थान काय?


तर राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक निवडणुकीतील प्रचारादरम्यान केला होता. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षात काय स्थान आहे ते ए आहे की बी, सी किंवा डी आहे हे त्यांनी आधी चेक करावं. त्यांच्या पक्षापेक्षा सहकाऱ्यांना विचारावं की यांची कॅटेगरी कोणती आहेत ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे नाही सांगणार."