Sharad Pawar: मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती देताना आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तर, विरोधकांकडून एन्काऊंटरच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) राजीनाम्याची मागणी करत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या घटनेवर अनेस प्रश्न उपस्थित करत कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत गृहमंत्र्यांना ताबडतोब पदावरुन हटवलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही सवाल उपस्थित केले आहेत.

  


बदलापूर एन्काऊंटर प्रकरणावरुन राजकीय प्रतिक्रिया येत असून या खटल्यातील सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर लगेच सुरू झालेले आरोप प्रत्यारोप दुर्दैवी आहे. या प्रकरणातल्या सर्व बाबींवर पोलीस तपासानंतर अधिक तथ्य समोर येणार असल्याचं उज्वल निकम यांनी म्हटलं. तसेच, याप्रकरणी न्यायालयीन चौकशी होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


''बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.'', असे शरद पवार यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. 






पोलिसांना एन्काऊंटरचे आदेश कोणी दिले?


आरोपीला न्यायालयाच्या दारात नेऊन त्याचा एन्काऊंटर घडवून आणणं हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे, अशा शब्दात या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण घटनेची तपशीलवार माहिती घेऊन त्या अनुषंगाने गुन्हेगारांना शिक्षा व पीडितांना न्याय देण्यासाठी म्हणून न्यायपालिका भूमिका बजावत असते. पण याउलट युपी-बिहारची एन्काऊंटर संस्कृती महाराष्ट्रात आणण्याचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. कायदा गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठीच आहे, पण कायद्याचा गैरवापर जेव्हा केला जातो तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. कुणी म्हणतंय की अक्षयने आत्महत्येचा प्रयत्न केला, कुणी म्हणतंय की पोलिसांनी एन्काऊंटर केलं... आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर पोलिस काय करत होते? पोलिसांना एन्काऊंटरचे आदेश कुणी दिले? गोळ्या कुठे लागल्या? हे प्रकरण संशयास्पद असून याची न्यायिक चौकशी व्हायलाच हवी. पण त्यासोबतच, महत्त्वाचं म्हणजे, निवडणुका तोंडावर असताना अशा हिंसक व न्यायविरोधी घटना घडवून आणून लोकांच्या भावनांशी खेळणं हे अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात नक्की काय लपवलं जातंय, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय?, असे सवाल यांनी आव्हाड यांनी विचारले आहेत. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया


"बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी गुन्हेगार अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्याच्या तपासासाठी आणत असताना त्याने पोलिसांची बंदूक खेचून पोलिसांवर फायरिंग केली. त्यात एपीआय निलेश मोरे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ बचावासाठी गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. आता पोलिस तपासात वस्तुस्थिती डिटेलमध्ये समजून येईल", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तसेच, ज्यावेळी या लहान मुलीवर अन्याय झाला, त्यावेळी विरोधक सांगत होते याला फाशी द्या, आता तिचं विरोधक आरोपीची बाजू घेत आहे. ज्याने माणुसकीला काळिमा फासणारी कृत्य केले, अश्या आरोपीची बाजू घेणे म्हणजे निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा, असे म्हणत विरोधकांच्या टीकेवर पलटवार केला. 


हेही वाचा


 पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल