Sharad Pawar EXCLUSIVE : "मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही, त्यांनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. शरद पवार यांनी एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अदानी प्रकरणात जेपीसी, पहाटेचा शपथविधी, फडतूस-काडतूसवरुन रंगलेलं राजकारण यासह विवित मुद्द्यांवर भाष्य केलं. सोबतच राजकीय नेत्यांना सल्ला देताना त्यांचे कानही टोचले. शरद पवारांची ही संपूर्ण मुलाखत आज दुपारी चार वाजता एबीपी माझावर पाहायला मिळायला मिळेल.
'सहकारी पक्षांसोबत डायलॉग ठेवण्याची आवश्यकता होती'
शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्रीपद दोन्ही पदे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन संख्येच्या वरुन तयार झाली होती. यामध्ये तिन्ही पक्षाचा सहभाग होता. त्या संबंधित दुसरा निर्णय जर कोणी घेत असेल, राजीनामा देत असेल, त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत डायलॉग ठेवण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेण्याचा दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही
...तर मी विरोध करणार नाही, अदानी प्रकरणात जेपीसीवर पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान अदानी प्रकरणात जेपीसीसंदर्भात शरद पवार यांचे सूर बदलल्याचे दिसत आहेत. सहकाऱ्यांना जेपीसी आवश्यक वाटत असेल तर विरोध करणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. मित्राचं मत माझ्यापेक्षा वेगळं आहे. पण आम्हाला यात ऐक्य ठेवायचं आहे. माझं मत मी मांडलं. पण सहकाऱ्यांना वाटत असेल की जेपीसी पाहिले, तर मी त्याला विरोध करणार नाही. त्यांच्या मताशी सहमत नाही पण विरोधकांची एकीवर दुष्परिणाम होऊ देणार नाही. याबाबतीत आम्ही आग्रह धरणार नाही.
वैयक्तिक हल्ला नको, फडतूस-काडतूसवर पवारांनी कान टोचले
राज्यात फडतूस शब्दावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार सामना पाहायला मिळाला. परंतु फडतूस आणि काडतूस शब्दावरुन शरद पवार यांनी सर्वच नेत्यांचे कान टोचले. वैयक्तिक टीकाटिप्पणी करु नका, असे खडेबोल शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना सुनावले. "मला जो महाराष्ट्र माहित आहे, जी संस्कृती माहित आहे, जनतेची मानसिकता माहित आहे, अशा गोष्टी शक्यतो टाळा. वैयक्तिक हल्ला नको, राजकीय विषय घ्या, लोकांचे विषय घ्या, त्यावर आक्रमक व्हा, परंतु वैयक्तिक हल्ला, चिखलफेक ही स्थिती येता कामा नये. हे टाळण्याचं काम जाणीवपूर्व केलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
पहाटेचा शपथविधीबाबत शरद पवार म्हणतात..
राज्याच्या राजकारणात आजही पहाटेच्या शपथविधीची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथेमुळे राज्यात भूकंप आला होता. या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले की, कोण कशी भूमिका घेईल, हे आज सांगता येणार नाहीत. पण हे जे तीन पक्ष आहेत, त्यांच्या सहकाऱ्यांची एकत्रित काम करण्याची मानसिकता आहे. जोपर्यंत ही मानसिकता आहे तोपर्यंत मला काळजी नाही. उद्या ही मानसिकता सोडून कोणी वेगळं जाण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांचा निर्णय असेल. तिन्ही पक्षांचा असणार नाही.
VIDEO : Sharad Pawar : राजीनामा देताना उद्धव ठाकरेंना सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही, पवारांचं वक्तव्य