Sanjay Raut on Chandrakant Patil : राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाबरी मशिदी विद्ध्वंसावरुन केलेल्या वक्तव्याचा संजय राऊतांनी (Sanjay Raut) चांगला समाचार घेतला आहे. पाटलांच्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री राजीनामा देणार का, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, अशा आशयाचं वक्तव्य पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन एकप्रकारे बाळासाहेब ठाकरे यांच्याच भूमिकेवर सवाल उपस्थित केल्याचं म्हटलं जात आहे. त्यावरुन आता राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना टार्गेट केलं आहे.
"एवढे दिवस पळपुटे चंद्रकांत पाटील कुठे होते?" असा थेट सवालही राऊतांनी केला आहे. "चंद्रकांत पाटलांनी थेट बाळासाहेबांचा अपमान केलाय त्यामुळे आता भाजपसोबत मांडीला मांडी लावून बसलेल्या त्या 40 लोकांचे काय म्हणणं आहे असा प्रश्न विचारत शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांचा अपमान करण्याची हिंमत आत्तापर्यंत कधी कुणी दाखवली नव्हती, तुम्ही गुलाम झाल्यामुळे किंवा भाजपने शिवसेना फोडल्यामुळे भाजपचे लोक सातत्याने बाळासाहेबांचा अपमान करत आहेत. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया द्यावी," असं राऊत म्हणाले.
बाबरी पाडणारे आमचे शिवसैनिक होते : संजय राऊत
बाबरी तोडल्यानंतर भाजपने पलायन केलं, हा इतिहास आहे. बाबरी तोडणारे भाजपचे किंवा अन्य संघटनांचे कुणी नव्हते ते आमचे शिवसैनिक होते. खरं तर हिंदुत्वावर शिवसेना सोडली असे म्हणतं जे तीर मारतात त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. भाजपने ज्या पळपुट्यांना घेऊन सरकार बनवलंय त्यांच्या दैवतांचा अपमान होतोय. भाजपची हिंमत एवढी वाढलीय की ते आमच्या दैवताचा अपमान करत चिखलफेक करु लागले आहेत. याच चिखलात बसून डॉ मिंधे आणि 40 आमदार सत्ता भोगतायत. पण सत्तेतले मिंधे यावर तोंड उघडणार नसल्याचंही राऊत म्हणाले.
खरंतर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर राजीनामा देण्याची हिंमत नसेल तर त्यांना शिवसेनेचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचं राऊत म्हणाले. हातात नकली धनुष्यबाण आणि भाजपच्या चड्डीचे नाडे पकडून शिंदे गट अयोध्येत गेले होते. आता यावर त्यांची भूमिका काय असणार असा सवाल राऊतांनी विचारला आहे. चंद्रकांत पाटील यांना इतक्या वर्षांची बोलण्याची गरजच काय होती? असंही राऊत म्हणाले.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
बाबरी मशिदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. एका टीव्ही मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. पाटील यांनी एका प्रादेशिक वृत्तवाहिनीमध्ये बोलताना सांगितलं की, “मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते."
संबंधित बातमी