कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापुरात (Kolhapur) येऊन महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. मोदींच्या सभेनंतर महायुतीच्या उमेदवारांसह महायुतीच्या नेत्यांचाही विश्वास दुणावला असून कोल्हापुरात आमचाचा विजय होईल, असा विश्वास काही नेत्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात मोदी विरुद्ध गादी असा वाद रंगला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही, मान देऊ गादीला-मत देऊ मोदीला अशी घोषणा कोल्हापुरातून केली होती. त्यानंतर, आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची कोल्हापुरात सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापुरातील सभेतून मोदी सरकारला थेट इशाराच दिला आहे. महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात मोदींना लक्ष्य केलं. शरद पवार यांच्याअगोदर माजी मंत्री सतेज पाटील यांनीही शिवाजी महाराजांचा विचार दिल्लीला पाठवणारी ही निवडणूक असल्याचे म्हटले. 


कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आज गांधी शिव शाहू निर्धार सभा आयोजित करण्यात आली. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरेंसह काँग्रेसमधील बडे नेतेही कोल्हापुरात उपस्थित होते. मोदींनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात सभा घेतली. त्यानंतर,आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सभा घेऊन शाहू महाराजांना निवडून देण्याचं आवाहन कोल्हापूरकरांना केलं आहे. शरद पवारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास सांगत भाषणाला सुरुवात केली. हजारोंच्या संख्येने तरुण त्यावेळी घरातून बाहेर पडले. मराठी माणसांचं हे राज्य झालं पाहिजे, यासाठी पडेल ती किंमत त्यांनी दिली. त्यामध्ये, कोल्हापूरच्या भूमीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, असेही शरद पवार यांनी म्हटले. तर, आपल्या भाषणातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.  


इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना, राज्यातील अनेक भागात जायच्या आणि देशातील गरीब लोकांची गरिबी कशी घालवायची यावर विचार मांडायच्या. देशाच्या सर्वच पंतप्रधानांनी हे काम केलं. मात्र, आत्ताचे पंतप्रधान महाराष्ट्रात येतात आणि त्यांना दोन लोकांची आठवण प्रकर्षणाने होते. एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार, यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. मोदीसाहेब, तुम्ही महाराष्ट्रात कितीदाही आलात, कितीही टीका केली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं तर हा महाराष्ट्र बोलणार नाही. पण, ज्यादिवशी संधी मिळेल त्यादिवशी तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी आमची तयारी आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल केला. 


आपला स्कोअर चांगला


आम्ही टी-20 खेळत असून आता शेवटच्या ओव्हर बाकी आहेत, आपला स्कोअर चांगला झाला आहे. आता राहिलेल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी, असे आवाहन काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आपल्या भाषणातून केले. फुले, शाहू आंबेडकरांचा आवाज धुमधडाक्यात पोहोचला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र कोल्हापूरकडे पाहत आहे. शाहू महाराजांच्या मताधिक्याची उत्सुकता असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले.


हेही वाचा


''नरेंद्र मोदी घुम रहे है बनकर भारत का आत्मा...''; शरद पवारांवरील टीकेवर आठवलेस्टाईल काव्यमय फटकेबाजी