सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constitiency) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अकलूज (Akluj) आणि माळशिरस (Malshiras) येथील सभांतून थेट धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्यावर निशाणा साधताना आता गुंडगिरी, झुंडशाही, भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा थेट इशारा दिला होता. तुमच्या टीकेला कृतीतून उत्तर दिले जाईल, असेही फडणवीस यांनी अकलूजच्या विजय चौकात सांगितले होते. विशेष म्हणजे अकलूज येथे दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेत भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी रस्त्यात थांबवून गुलाबाचा गुच्छ देण्याचा प्रयत्न केल्यावर फडणवीस यांनी तेथे न थांबता थेट सभास्थानी गाठले होते. 


मोहिते पाटील फडणवीसांच्या निशाण्यावर


यामुळेच आता फडणवीस यांनी मोहिते पाटील यांना निशाण्यावर घेतल्याचे स्पष्ट झाले होते. मोहिते पाटील यांना काय-काय मदत केली, याचा देखील उल्लेख फडणवीस यांनी केला असताना आता थेट कृती केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले होते. यानंतर मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट देवेंद्र फडणीस यांना अंगावर घेत, मी कोणत्या दबावाला भीक घालणार नाही, वेळ पडली तर तुरुंगामध्ये जाऊन बसण्याची तयारी केल्याचे सांगत थेट आव्हान दिले आहे.


मोहिते पाटीलांच्या संस्थांवर आरोप


मोहिते पाटील यांच्या संस्था आणि इतर ठिकाणी काही अनियमितता असल्याचे आरोप सातत्याने होत होते. अनेक संस्थांचे पैसे दिले गेले नसल्याचे आरोपही होत होतो. जयसिंह मोहिते पाटील यांनी यापूर्वीच ज्या संस्थांचे पैसे देणे बाकी आहे, ते देणे सुरु असून आम्ही ईडीला घाबरत नसल्याचे सांगितले होते. आता माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी फडणवीस यांना थेट आव्हान देत मी कशाला घाबरत नाही, असा इशारा दिला आहे. करमाळा तालुक्यातील केम येथे सभेत बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी पहिल्यांदाच या दबावावर उत्तर दिले. 


कोणत्याही गोष्टीला भीक घालत नाही


मोहिते पाटील म्हणाले, आजच्या भाषणात तर अजून दबाव आले आहेत, पण मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे, त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टीला भीक घालत नाही. हे केवळ तुमच्यासाठी भीक घालणार नाही. ठरवतानाच मी कुटुंबात माझ्या वडिलांना, आईला आणि मंडळीला दोन मुलींना सांगितलं होते की, इलेक्शन झाल्यानंतर मला अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे आणि माझी काहीही तयारी आहे, ती फक्त मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी सर्व सामान्यांसाठी मी काय पण किंमत मोजेल, आत बसण्याची तयारी देखील ठेवली आहे. 


घरमालकाला बाहेर काढून घर बळकावण्याचा प्रयत्न


मानसिकता केली आहे आणि मगच निवडणुकीला उतरलो आहे. ही मनाची तयारी झाल्यावरच निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि पवार साहेबांना भेटून तुमच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढणार असल्याचे सांगितल्याचे, धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. आज तुम्ही घरमालकाला सुद्धा बाहेर काढून घर बळकावण्याचे काम करीत आहेत, असे सांगत शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना बळकाविल्याचा भाजपाला टोला लगावला. उतारा त्यांचे नावावर, घर त्यांच्या नावावर आणि तुम्ही ते घर त्यांचे नाही म्हणून सांगता, असाही टोला भाजपाला लगावला. 


आता आर-पारची लढाई


आता मोहिते पाटील यांनी भाजप आणि फडणवीस यांना थेट आव्हान दिल्याने माढा लोकसभा निवडणूक आता शरद पवार विरुद्ध फडणवीस अशी न राहता मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील अशी होण्याची चिन्हे दिसू लागल्याने आता भाजप आणि फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपच्या विरोधात जाताना काय-काय गोष्टी बाहेर निघू शकतात, त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची मानसिकता मोहिते पाटील यांनीही केल्याने आता आर या पारच्या लढाईला सुरुवात होणार आहे. ज्यापद्धतीने धैर्यशील मोहिते पाटील यांनी आतमध्ये बसायची मानसिकता निवडणूक काढण्यापूर्वी केल्याचे सांगितले त्यावरून माढा लोकसभेत अजून बऱ्याच घडामोडी घडू शकणार आहेत. मोहिते पाटील यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांनाच अंगावर घेतल्याने या मतदारसंघातील रंगात अधिक वाढत जाणार आहे.