पुणे : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचे सांगत शरद पवारांपासून (Sharad pawar) वेगळं होऊन महायुतीसोबत जाणे पसंत केले. महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा मोठा पराभव झाला. शरद पवारांचे केवळ 10 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे. मात्र, अजित पवारांनी (Ajit pawar) या चर्चेला कुठलाही आधार नसल्याचे म्हटले. तर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असं शरद पवारांनी म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच, गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार हे कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. आता, पुणे (Pune) दौऱ्यावर असताना शरद पवारांनी थेट फोन करुन अजित पवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बराच काळ अबोला राहिलेल्या शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सातत्याने गाठीभेटी होत असून काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते चर्चा करतानाचाही व्हिडिओ समोर आला होता. आता, शरद पवारांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात नव्या उभारण्यात येत असलेल्या पुरंदर विमानतळाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भाने शरद पवारांनी अजित पवारांना फोन करुन चर्चा केली. पुरंदर विमानतळ आणि येथील शेतकऱ्यांचा विरोध याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. पुण्याचे जिल्हाधिकारी याबाबतीत लक्ष घालत असल्याची माहिती अजित पवार यांनी शरद पवारांना दिली. दरम्यान, पुण्यात शरद पवार यांना भेटण्यासाठी आज पुरंदर येथील शेतकरी त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. शेतकऱ्यांनी त्यांची अडचण सांगितल्यानंतर शरद पवारांनी थेट पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना केला फोन करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली.
शरद पवारांमुळेच महिला आरक्षण - अजित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमावेळी बोलताना शरद पवारांबाबतचा महिला आरक्षण देतानाचा एक किस्सा सांगितला होता. शरद पवारसाहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आरक्षणाचे बिल आणलं, पवारसाहेबांनी सांगितलं होतं की, हे बिल मंजूर होईपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू राहील. मला आठवत आहे की, सभागृह चार वाजेपर्यंत चालवलं आणि महिला आरक्षणाचे बिल पास करून घेतलं. साहेबांनी ठणकावून सांगितलं की, आज कितीही उशीर झाला तरी चालेल पण आज महाराष्ट्रात महिला आरक्षणाचे बिल मला आणायचा आहे आणि हे बिल पवारसाहेब मुख्यमंत्री असताना पास झालं होतं. असा महिला आरक्षण बिल पास करतानाचा किस्सा अजित पवारांनी सांगितला आहे.