Sharad Pawar पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. महायुती व महाविकास आघाडीकडून जागावाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे, राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुक उमेदवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं असून पुन्हा एकदा शरद पवारांचा (Sharad Pawar) करिश्मा महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळेच, विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील (NCP) इच्छुक उमेदवारांची रेलचेल पाहायला मिळत आहे. आज गोविंदबागेत 3 ते 4 नेत्यांनी भेट घेऊन उमेदवारीची इच्छा व्यक्त केलीय.  


राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. मात्र, दुसरीकडे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे देखील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना भेटले होते. अण्णासाहेब शेलार देखील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. अण्णासाहेब शेलार हे पूर्वीचे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष  श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून नेमकी कुणाला तिकीट देणार हे पाहणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. जरी राहुल जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी अण्णासाहेब शेलार हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे, येथे तुतारी कोण वाजवणार हे लवकरच स्पष्ट होईल. 


श्रीगोंदा येथून राहुल जगताप


लोकसभेला श्रीगोंदा मतदारसंघातून आम्ही लंकेना 33 हजार मताचे मताधिक्य दिले आहे. कार्यकर्त्यांची इच्छा होती साहेबांना भेटण्याची म्हणून भेटीसाठी आलो. उमेदवारीची मागणी आम्ही केली आहे, साहेबांनी आशीर्वाद दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत मला साहेब संधी देतील, मी आमदार होईल. आमच्या पक्षातून कुणीही इच्छुक नाहीये, मित्रपक्षांतून इच्छुक आहेत. पण श्रीगोंदाची जागा मला मिळेल आणि मी निवडून येईल, असे राहुल जगताप यांनी या भेटीनंतर बोलताना म्हटले. 


सक्षणा सलगार इच्छुक 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती अध्यक्ष सक्षणा सलगर यांनी देखील शरद पवार यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी सक्षणा सलगर यांनी केली. 


इंदापूरसाठी प्रविण मानेंनी घेतली भेट


पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी आज बारामतीमध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेत इंदापूर विधानसभेतून उमेदवारीची मागणी केली आहे. यावेळी सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने देखील उपस्थित होते. दुसरीकडे ऐन लोकसभेत एकाकी पडलेल्या सुप्रिया सुळेंच्या मदतीला धावून आलेले पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे देखील पवार गटाकडून इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक असल्याने शरद पवार कोणाला संधी देणार याची उत्सुकता इंदापूरकरांना आहे. 


बारामती मध्ये साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी सदिच्छा भेट घेतली आहे त्यासाठी बारामतीत आलो होतो.नेहमीच साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी बारामतीत येत असतो. साहेबांसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. उजनी धरणाच्या पाण्याची स्थिती चाऱ्याचा प्रश्न दुधाचे प्रश्न या संदर्भात साहेबांनी माझ्याकडून माहिती घेतली. विधानसभेसाठी मी इच्छुक आहे. साहेबांना देखील मी सांगितलं की मी इच्छुक आहे. साहेब जो निर्णय सांगतील तो सर्वांना मान्य असेल. साहेबांनी माझी भूमिका ऐकून घेतली, प्रत्येक उमेदवाराला वाटत असतं की आपल्याला उमेदवारी मिळावी, असे प्रविण माने यांनी म्हटले. तसेच, हर्षवर्धन पाटलांबाबत मला काही माहीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


सोलापूरसाठी महेश कोठेंनी घेतली भेट


दरम्यान, सोलापूर येथील नेते महेश कोठे यांनीही बारामतीत येऊन शरद पवारांची भेट घेतली आहे. महेश कोठे हेही विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 


हेही वाचा


Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श