Atishi CM नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि आमदार आतिशी मार्लेना (Atishi) यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची (Chief minister) शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आतिशी यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे, आतिशी ह्या दिल्लीच्या तिसऱ्या आणि सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. आतिशी यांच्यासोबत आपचे आमदार गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. सुल्तानपुर माजरा येथील आमदार मुकेश अहलावत हेही पहिल्यांदाच दिल्ली सरकारमध्ये मंत्री बनले आहेत. तर, गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, इमरान हुसैन हे यापूर्वीच्या अरविंद केजरीवाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर कार्यरत होते. 


अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांनी आज दिल्लीचे सुत्रे हाती घेतली आहेत. मद्यधोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर, सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत होती. त्यामुळे, अरविंद केजरीवाल यांनी जामीनावर मुक्तता होताच, आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिली. तसेच, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर आतिशी मार्लेना यांची निवड केली आहे. त्यामुळेच, आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री व आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांचे अभिनंदन केले. त्यावेळी, मुख्यमंत्री आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांचा पाया पडून आशीर्वाद घेतले. आतिशी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


आतिशींची संपत्ती किती?


आतिशी या परदेशात शिकलेल्या आहेत. त्यांनी पदव्युत्तर आतिशी यांचे वडील विजय कुमार सिंब आणि आई तृप्ती वाही दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर होते. आतिशी यांचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले आहे.  आतिशींचे पूर्ण नाव आतिशी मार्लेना सिंग  आहे. मार्क्स आणि लेनिन या नावाचा आधार घेऊन मार्लेना नाव निवडले आहे. मार्लेना नावापेक्षा कामावर चर्चा व्हावी म्हणून 2018 साली त्यांनी आतिशी नाव धारण केले आहे. आतिशी यांच्याकडे जवळपास 1.41 कोटींची संपत्ती आहे. कोट्यवधींची मालकीण असलेल्या आतिशी यांच्याकडे ना स्वत:चे घर आहे ना त्यांच्या नावावर कोणती जमीन आहे. शपथविधीनंतर 26 आणि 27 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच अधिवेशन होणार आहे. 2 दिवसांच्या या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार असल्याची माहिती आहे. 


देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री


आतिशी मार्लेना वयाच्या 43 व्या वर्षी मुख्यमंत्री बनल्या आहेत. आतिशी सध्याच्या घडीला भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री असणार आहेत. देशातील चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलायचे झाले तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या यादीत 9 व्या क्रमांकावर आहेत. योगी आदित्यनाथ यांचं वय 52 आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचं वय 49 आहे, ते 5 व्या क्रमांकावर आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं वय 49 आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे वय 73 आहे. सध्याच्या घडीला भारतातील सर्वात वयस्कर मुख्यमंत्री पिनराई विजयन आहेत, त्यांचं वय 79 आहे.