पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीचं जागावाटप, अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा, आणि राज्यातील आरक्षण प्रश्नावरुन सुरु असलेल्या आंदोलनांच्या संदर्भात शरद पवार यांनी भाष्य केलं. आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज आहे. याशिवाय सरकारनं देखील याबाबत विलंब लावू नये लोकांना विश्वासात घेऊन पूर्तता करावी, असं शरद पवार म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणूक तीन पक्ष मिळून लढणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. तीन पक्ष एकत्र लढतात असतात त्यावेळी कुठल्याही एका जागेवर तिघांपैकी कुणी ती लढवावी याबाबतचा निर्णय आणि एकवाक्यता करावी लागते. ती प्रक्रिया सुरु आहे. तिन्ही पक्षांचे नेते गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत बसत आहेत. जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर तो तो पक्ष तिथं कोण उमेदवार द्यायचा विचार करेल. आम्ही तीन पक्ष एकत्र बैठक घेणार आहोत, असं शरद पवार म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयोग राज्यात स्थिती काय याची पाहणी करेल, ही चांगली गोष्ट आहे, असं शरद पवार म्हणाले. राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाला सूचना देण्याची संधी असते. निवडणूक आयोगाशी सुसंवाद साधायला चांगली संधी असते.
अरविंद केजरीवाल चांगलं काम करत होते. केजरीवाल यांची टीम देखील चांगलं काम करत होती. अरविंद केजरीवाल यांना एका विशिष्ट स्थितीत कॉर्नर करण्यात आलं, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं गेलं. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री म्हणून ज्यांची निवड करण्यात आली त्यांचं काम आम्ही दिल्लीत पाहतोय, असं शरद पवार म्हणाले. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून या पूर्वी दोन महिला नेत्यांनी नेतृत्त्व केलं. दिल्लीच्या प्रशासनाचा दर्जा उंचावला. त्याचप्रकारे अतिशी देखील काम करतील, अशी आशा असल्याचं शरद पवार म्हणाले.
पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. सरकारनं शेतकऱ्यांसाठी काही धोरणं जाहीर करतो म्हणून सांगितलं आहे. काही धोरणं जाहीर करण्यात आली पण शेवटी शेतकऱ्यापर्यंत काय पोहोचलं हा महत्त्वाचा भाग आहे. फार मोठा वर्ग असा आहे ज्याच्या पर्यंत काही पोहोचलं नाही त्याच्यामुळं तो अस्वस्थ आहे. आम्ही काही दिवस थांबू आणि मुख्यमंत्र्यांना भेटून दुरुस्ती करता येते का ते पाहू, त्यातून मार्ग निघेल असं शरद पवार म्हणाले.
सामंजस्यानं प्रश्न सोडवण्याची गरज
आरक्षणाच्या प्रश्नावरुन तणाव वाढत असल्यासंदर्भात पत्रकारांनी माहिती देत प्रश्न विचारला यावर शरद पवार यांनी सामंजस्यानं असे प्रश्न सोडवायचे असतात. तणाव होण्याचं कारण नाही, शेवटी आपण सगळे जात धर्म काही असली तरी भारतीय आहोत. महाराष्ट्राचे घटक आहोत. आपल्या सगळ्यांमध्ये सामंजस्य कसं करता येईल याबाबतची भूमिका या क्षेत्रात नेतृत्त्व करतात त्यांनी घेतली पाहिजे. राज्य सरकारनं अशा प्रश्नांना विलंब लावू नये, लोकांना विश्वासात घ्या आणि त्याची पूर्तता करुन वातावरण कसं चांगलं राहील याची काळजी घ्या, असं शरद पवार यांनी म्हटलं.