सांगली : सांगली (Sangli News)  जिल्ह्यातील  खानापूर विधानसभा मतदारसंघातून  वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार जाहीर झाला आहे. खानापूर तालुक्यातील नागेवाडीचे  संग्राम माने यांची प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उमेदवारी जाहीर  केली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच वंचितच्या या उमेदवारीचा निवडणुकीत कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. 


संग्राम हे ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे सचिव म्हणून काम करत आहेत. दुसरीकडे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार राहिलेले अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांची उमेदवारी निश्चित आहे. तर आता भाजपमध्ये असलेले  माजी आमदार राजेंद्र देशमुख हे देखील विधानसभेच्या तोंडावर काही वेगळा  निर्णय घेऊन निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. यामध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे वैभव पाटील आणि भाजपचे  नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचे ब्रम्हानंद पडळकर   यांनी देखील खानापूर मतदारसंघात उमेदवारीसाठी फिल्डींग लावली आहे. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात कोण कुणाकडून उमेदवारी मिळवते आणि किती जण बंड करत अपक्ष निवडणूक लढवतात  यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने संग्राम माने यांची उमेदवारी जाहिर करत आघाडी घेतली आहे. 


कोण आहेत संग्राम माने?



  • खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावचे  संग्राम माने 

  • ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे ते सचिव आहेत

  • ओबीसी समाजासाठी सातत्याने त्यानी लढा दिलाय

  • गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी नागेवाडी पंचायत समिती गणातून खानापूर पंचायत समितीची निवडणूक लढविली होती


 वंचित आघाडीच्या 11 उमेदवारांची यादी जाहीर 


विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यास अद्याप कालावधी आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने 'आघाडी' घेतली आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या 11  जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व उमेदवार  विदर्भ-मराठवाड्यातील आहे.  यामध्ये भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.  


हे ही वाचा :


माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचे वीज बिल भरले नाही, इंजिनियरला हजार रुपये दिले की झालं काम; केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितला अजब किस्सा