ठाणे: सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले. ते दिल्लीत जाऊन 'तिकीट द्या, तिकीट द्या', करत होते. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला फारशी आवडणारी नाही, असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. ते मंगळवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 


छत्रपतींची कोल्हापूरची गादी असो किंवा सातारची गादी असो. या गादीबद्दल आम्हाला आदर आहे. छत्रपतींच्या वंशजांनी ही गादी आचारविचाराचे पालन करुन पुढे चालवली पाहिजे. पण उदयनराजे यांची कृत्य, दुष्कृत्य साताऱ्यात आणि सगळीकडे बघितली आहेत. त्यांचं वागणं गादीचा सन्मान ठेवणारं असतं तर ठीक होते. महाराष्ट्राला एक परंपरा आहे. आजही छत्रपतींच्या गादीला सर्वजण मान देतात, त्या गादीचा मान ठेवायला पाहिजे होता. आपण कोणासमोर झुकत आहोत, याचा विचार उदयनराजे यांनी केला पाहिजे होता. पण ते साताऱ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी चार दिवस दिल्लीत होते. दिल्लीच्या तख्तासमोर ते मला तिकीट द्या, तिकीट द्या, असे सांगत होते. ही गोष्ट लोकांना फारशी आवडणार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.


बेलेचा खून कोणी केला, कसा केला, हे सर्व सातारकरांना माहिती आहे. दुसऱ्यांचे मुडदे पाडणारे इतरांवर घोटाळ्यांचे आरोप करतात, हे जरा आश्चर्यकारक आहे, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.


सत्तेपुढे नतमस्तक होणारे कधीच न्याय मिळवून देऊ शकत नाही: जितेंद्र आव्हाड


शशिकांत शिंदे हा अत्यंत गरीब घराण्यातून आलेला माणूस आहे. त्यांच्या घरची परिस्थिती काय होती हे राजेंनाही माहिती आहे. शरद पवारांनी कायम ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची ताकद, हिम्मत, कर्तृत्त्व आहे त्यांना मोठं केलंय. त्याचा वारसा काय हे कधीच बघितलं नाही. शशिकांत शिंदे हा गरीब घरातला माथाडी कामगार आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी राजेंना अंगावर घेतला आहे. त्यामुळे खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे आहेत. शशिकांत शिंदेच जनतेला न्याय देऊ शकतात. सत्तेपुढे नतमस्तक होणारे कधीच न्याय मिळवून देऊ शकत नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. 


शाहू महाराजांना जसं घरी बसून तिकीट दिलं, त्यांना कुठे तिकीट द्या, तिकीट द्या, करत फिरावं लागलं नाही. साताऱ्याच्या गादीचा इतिहास फार मोठा आहे. अशाप्रकारे तिकीट मिळवणं म्हणजे त्या गादीचा अपमान आहे. तुम्ही ज्याचा वारसा सांभाळता त्या गादीने एकेकाळी दिल्लीला आव्हान दिलं होते. त्या गादीवर बसलेला वारस हा जर दिल्ली पुढे नतमस्तक होत असेल तो तुमचा नाही, तर उभ्या महाराष्ट्राचा अपमान आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.


आणखी वाचा


इकडं उमेदवारी जाहीर होताच शशिकांत शिंदे मताधिक्यावर बोलले; तिकडं उदयनराजे भोसले प्लॅनिंग केलंय म्हणत नेमकं काय म्हणाले?