कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही शिवसेनेचे मेळावे, अमित शाह यांच्याकडून होणारी टीका, आगामी निवडणुका, उदय सामंत यांचे आमदार फुटण्याचे दावे, दावोसमधील गुंतवणूक याबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह आणि त्यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे असं शरद पवार म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करण्यासाठी दोघांनी कार्यक्रम घेतले. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करण्याचा अधिकार आपला आहे असं दोघांनाही वाटतं आणि त्याची प्रचिती आपण पाहिली. पण लोकांची उपस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक होती, असं निरिक्षणावरुन दिसतं, असं शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी याच्या अगोदर मतं मांडलं होतं. दोन दिवसांपूर्वी ते माझ्याकडे आले होते, सविस्तर चर्चा झाली. काल त्यांनी जे काय सांगितलं तसं त्यांचं मत आहे, मात्र त्यासाठी टोकाची भूमिका घेतली जाईल, असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.
अमित शाह यांच्यावर टीका आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ठाकरेंनी मौन बाळगलं असं पाहायला मिळालं असं विचारलं असता शरद पवार यांनी तसं वाटत नसल्याचं म्हटलं. अमित शाह सातत्यानं हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेतृत्त्वानं घेतलेली आहे. अमित शाह आणि त्यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री अधिक तारतम्य ठेवून भाष्य करेल, अशी अपेक्षा असते. त्याची प्रचिती तिथून काही येत नाही. खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत. अमित शाह हे कोल्हापूरला शिकले की कुठं शिकले मला माहिती नाही, असं शरद पवार म्हणाले.
उदय सामंतांचं स्टेटमेंट दावोसमधील पाहिलं, भांडवली गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला गेले होते की लोक फोडायला गेले होते ते माहिती नाही. दावोसमधून त्यांनी जी काही विधान केली ती मुख्यमंत्र्यांचा दावोसचा उद्देश होता त्याच्या सुसंगत नव्हती. ते सांगत असतील तर पाहूया, असं शरद पवार यांनी म्हटलं.
मी काही फोटो पाहिले, ते लोक ठाकरेंची सेना सोडतील असं वाटत नाही. काही माणसं अशी आहेत की ते पक्ष आणि बाळासाहेबांची विचारधारा अजिबात सोडणार नाहीत, असं शरद पवार म्हणाले.
दावोसला मी देखील मुख्यमंत्री म्हणून गेलो होतो. काल जे करार झाले त्यात भारत फोर्जशी करार झाला, पुणे, कराडला त्यांचे कारखाने आहेत. जिंदाल हे स्टीलच्या फॅक्टरीत महाराष्ट्रात रत्नागिरी,नाशिक जिल्ह्यात आहेत. दावोसमधून हे जाहीर केलं, याचा अर्थ आहे ज्यांनी गुंतवणूक करायचं ठरवलंय त्या सगळ्यांना तिथून महाराष्ट्रात आणला असा देखावा केल्याचं दिसतं. आपण या हॉटेलमध्ये बसलेत, त्यांचे बंधू यांनी दावोसला करार केला हे माझ्या वाचनात आलंय, असं शरद पवार म्हणाले. फसवणूक असं नाही, नवीन उद्योग करत असतील तर हरकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं.
इतर बातम्या :