अमरावती :  अजित पवारांबदद्ल (Ajit Pawar) शरद पवारांनी (Sharad Pawar) अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे.  अजित पवार आमचेच नेते आहेत, ते भाजपसोबत गेले म्हणून पक्षात फूट पडली असं होत नाही, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोड्याच दिवसांत शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील मोदी सरकारला पाठिंबा देतील, असं  वक्तव्य  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर  राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न राजकारणात रस असणाऱ्यांना पडू लागला आहे.


बावनकुळे म्हणाले, वर्षभराच्या कार्यकाळात मोदींच्या नेतृत्वात विश्वकर्मा योजना, ओबीसी घटकांकरता योजना अशा अनेक योजनांवर काम सुरू आहे. गेल्या नऊ वर्षात जे निर्णय घेण्यात आलेले नाही ते निर्णय आम्ही वर्षभरात घेणार आहे. केंद्र सरकारचे हे कम पाहून शरद पवारांचे लवकरच मत आणि मनपरिवर्तन होईल. त्यानंतर अजित पवारांप्रमाणे  शरद पवार आणि सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील.


शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे आगामी काळात सत्तेत दिसतील असे वक्तव्य भाजप मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी केले आहे. उपाध्ये म्हणाले, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे लवकरच मनपरिवर्तन होणार याची खात्री आहे. देशाचा विकास हे फक्त मोदीच करू शकतात त्यामुळे आज जरी शरद पवार म्हणत असतील की भाजपसोबत जाणार नाही येणारा काळात ते भाजपसोबत असतील. शरद पवार आज नाही म्हणाले उद्या कदाचित ते हो म्हणतील. 


अमरावती लोकसभा ही जागा जर भाजपला मिळाली तर खासदार नवनीत राणा यांनी कमळावर निवडणूक लढवावी हा आमचा प्रयत्न  असणार आहे, अमरावती लोकसभेत कमळच चिन्ह आले पाहिजे. शेवटी विदर्भात सगळ्यांच्या मेहनतीने भाजप मोठा केला आहे, असे देखील बावनकुळे म्हणाले. 


काय म्हणाले शरद पवार?


विशेष म्हणजे अशाच आशयाचं वक्तव्य गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. आणि त्याला आज थोरल्या पवारांनी दुजोरा दिला. शरद पवार म्हणाले की, "ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे." 


हे ही वाचा :


अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट पडली म्हणायचं कारण नाही : शरद पवार