मुंबई : महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली. या भेटीमागचं नेमकं कारण काय हे या लेखातून जाणून घेता येईल. राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षण प्रश्न तोडगा काढावा तसेच राज्यात सध्या मराठा (maratha) आणि ओबीसी समाजामध्ये सुरू असलेला संघर्ष कायमस्वरूपी मिटावा यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन 9 जुलै रोजी करण्यात आलं होतं. सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संध्याकाळी पाच वाजता सुरू होणाऱ्या बैठकीला अचानक विरोधी पक्षाने येण्यास नकार दिला. महाविकास आघाडीतून या बैठकीस कोणताही नेता उपस्थित नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार अशी चर्चा होती. पण, शरद पवार हे सातारा दौऱ्याहून येत असल्यामुळे तेही पोहोचू शकणार नाही अशी माहिती ऐनवेळी देण्यात आली होती. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या नेत्यांची अनुपस्थिती हीच या बैठकीतील सर्वात मोठी चर्चा ठरली.  


विरोधी पक्षांनी अचानक बैठकीला दांडी मारल्यामुळे दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाने विरोधकांना कोंडीत पकडलं. राज्यात मराठा ओबीसी वाद निर्माण व्हावा, तो प्रश्न असाच महाराष्ट्रात राहावा आणि आपली राजकीय पोळी त्यावर भाजली जावी यासाठी विरोधी पक्षांनी बैठकीला दांडी मारली अशा पद्धतीचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी विधानसभा अधिवेशनात केला. त्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ झाला आणि सभागृह तहकूब करावं लागलं. त्यावर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आयोजित बैठक विधिमंडळात का घेतली नाही, सभागृहात विषय चर्चेला न आणता जाणीवपूर्वक सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक घेण्यात आल्यामुळे आम्ही बैठकीला आलो नाही, अशी भूमिका मांडली. तर दुसरीकडे आशिष शेलार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली की, अचानक बैठकीच्या दिवशी संध्याकाळी बारामतीवरुन फोन आला आणि विरोधकांनी बैठकीला दांडी मारली. 


सत्ताधारी पक्षाकडून शरद पवारच या सगळ्याच्या मागे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न झाला. याचा दुसरा टप्पा म्हणून थेट छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांनी दीड तास छगन भुजबळ यांना तात्काळ ठेवलं यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ वेळ घेऊन आले नव्हते. त्यामुळे त्यांना थांबावं लागल्याच सांगण्यात आलं. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात सत्ताधारी पक्षाने मनोज जरांगे यांच्यासोबतच ओबीसी आरक्षण प्रश्नासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन दिलं आहे, याची आम्हाला माहितीच नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला कसं येणार असा सवाल शरद पवारांनी छगन भुजबळांसमोर उपस्थित केला. त्यानंतर लवकरच मी या सगळ्या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेल आणि काय तोडगा मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्न काढता येईल यासाठी प्रयत्न करेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती. 


विरोधकांना भूमिका मांडावी लागणार


शरद पवारांच्या या भूमिकेनंतर आज मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत सरकारने नेमकं काय आश्वासन ओबीसी आणि मराठा नेत्यांना दिलं होतं, याबाबत मुख्यमंत्री शरद पवारांना माहिती देतील. त्यामुळे आता पुन्हा एकदा आरक्षणाचा चेंडू विरोधी पक्षाच्या कोर्टात आला असून आता विरोधी पक्षाला मराठा आरक्षण प्रश्न व ओबीसी आरक्षण प्रश्न याबाबत त्यांची भूमिका काय आहे हे मांडावं लागणार आहे.


तासभराच्या भेटीत 15 मिनिटे आरक्षण पे चर्चा


मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाली. साधारण 1 तासाच्या या भेटीत 15 मिनिटे मराठा-ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरच एकत्रित चर्चा झाल्याचे समजते. शरद पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने आतापर्यंत काय प्रयत्न केले याबाबत माहिती दिली. सरकार मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन देत आहे, याबाबत विरोधी पक्षाला काहीच माहिती नसते अशी भूमिका शरद पवार यांनी याआधी घेतली होती. आजच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली, त्यामुळे आता विरोधी पक्ष याबाबतीत काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


हेही वाचा


प्रणिती शिंंदेंच्या पहिल्याच प्रश्नावर केंद्राचा धक्का, 'जुनी पेन्शन'बाबत कोणताही विचार नाही, लेखी उत्तराने कर्मचाऱ्यांची निराशा!