बारामती: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या रंजक घडामोडी घडताना दिसत आहे. अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनी रविवारी अचानक शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे अतुल बेनके हे शरद पवार गटात जाणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, अतुल बेनके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्याला शरद पवार यांचा पाठिंबाही असल्याचे म्हटले होते. यापूर्वीही अतुल बेनके यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकते. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे अतुल बेनके यांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. 


अतुल बेनके आणि शरद पवारांच्या या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी बारामतीमध्ये लागलेल्या एका फलकाने राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जयसिंग देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला एक बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. या फलकावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार यांचा एकत्रित फोटो दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीत पवार घराण्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यामुळे बारामतीत पवार घराण्यात दोन उभे गट पडले होते. मात्र, यानंतर पुन्हा एकदा बारामतीत संपूर्ण पवार घराणे एकाच बॅनरवर झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे. 


अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आपल्या पत्नीला उतरवणे, ही मोठी चूक असल्याची जाहीर कबुली दिली होती. मी राजकारण घरापर्यंत नेले नव्हते पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


अतुल बेनकेंच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय?


अतुल बेनके यांनी रविवारी जुन्नरमध्ये  शरद पवार यांच्या स्वागतासाठी बॅनर्स लावले होते. यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीनंतर तुम्ही शरद पवार गटात जाणार का, असे विचारल्यानंतर अतुल बेनके यांनी कोड्यात टाकणारे उत्तर दिले होते. मी विधानसभेची निवडणूक अजित पवारांकडूनच लढवणार आहे. मात्र, शरद पवारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, असे बेनके यांनी म्हटले होते. त्यामुळे अतुल बेनके यांच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.


आणखी वाचा


राज्यात काहीही घडू शकतं, कदाचित शरद पवार-अजित पवार एकत्र येतील; अतुल बेनकेचं खळबळजनक वक्तव्य