Maharashtra Politics : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांचं (Vidhan Sabha Election 2024) बिगुल अद्याप वाजलं नसलं तरीदेखील सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं तयारी सुरू केली आहे. राज्यात यंदाच्या विधानसभेत महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) अशी चुरस रंगणार यात काही शंकाच नाही. पण तत्पूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात (Vadgaon Sheri Assembly Constituency) महायुतीत नाराजीचा सूर उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे (BJP) वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी ट्वीट केलं आहे. याच ट्वीटवरुन महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याचं बोललं जात आहे.
भाजपचे वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी ट्वीट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याचं जगदीश मुळीक यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. तीनशे कोटींच्या विकास कामांच भूमिपूजन मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत असतानाच त्याच्या आदल्या दिवशी जगदीश मुळीक यांनी ट्वीट करत तीनशे कोटींची विकास कामे केवळ टिंगरे यांच्या प्रयत्नातून झाली नसून महायुतीतील इतर घटक पक्षांचा देखील त्यात हातभार असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच, टिंगरे यांना महायुतीचा विसर पडला असून महायुती म्हणत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावणे टिंगरे कसे काय विसरले? असा सवाल देखील टिंगरे यांनी केला आहे.
जगदीश मुळीक यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलंय?
भाजपचे वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे! वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. पण या विकासकामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केला आहे, हे आमदार जाणीपूर्वक विसरत आहेत! तीनशे कोटींच्या विकासकामांचा निधी मिळतो, तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचंही योगदान आहे, पण त्यांचा साधा फोटो टाकण्याचे सौजन्यही आमदार महोदय श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवले नाही."
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावरुन महायुतीत पेच?
पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात महायुतीत कोणती जागा कोणाला मिळणार यासंदर्भात मोठा पेच वाढला आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात आत्ता सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा मतदारसंघावर स्वाभाविकपणे राष्ट्रवादीच्याच पारड्यात पडणार अशा चर्चा सुरू आहेत. नुकतंच वडगावशेरीमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा झाली. या दरम्यान अजित पवारांनी सुनील टिंगरे यांच्यासाठी जोरदार बॅटिंग करत पुन्हा सुनील टिंगरेचं उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे विरुद्ध भाजपचे जगदीश मुळीक यांच्यात लढत झाली होती. त्यात जगदीश मुळीक यांचा पराभव झाला होता. तर राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंनी बाजी मारली होती.