Continues below advertisement


सातारा : राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, महाबळेश्वर, फलटण, वाई कराड, म्हसवड, रहिमतपूर, पाचगणी आणि मलकापूर या नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. मेढा नगरपंचायतीत देखील तिरंगी सामना होत आहे. साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारासमोर समोर महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आला. फलटणला रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर रिंगणात आहेत.


वाई नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. नितीन कदम, भाजपकडून अनिल सावंत, काँग्रेसकडून प्रदीप जायगुडे निवडणूक लढवत आहेत. वाई नगरपालिकेची सदस्यसंख्या 22 इतकी आहे.


साताऱ्यात भाजपकडून अमोल मोहिते नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुवर्णा पाटील निवडणूक लढवत आहेत. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक त्यांच्या आघाड्यांऐवजी भाजपकडून लढत आहेत.


फलटणला भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना


फलटण नगरपालिकेसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. इथं भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर रिंगणात आहेत. फलटण नगरपालिकेची सदस्यसंख्या 27 आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रहिमतपूर नगरपालिकेत सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने विरुद्ध भाजपच्या वैशाली माने यांच्यात लढत होणार आहे.


म्हसवडला राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआ यांची आघाडी झाली असून इथं त्यांनी भुवनेश्वरी राजेमानेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपच्या पूजा वीरकर निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी बसपाच्या रुपाली सरतापे रिंगणात आहेत.


महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शिंदे, लोकमित्र जनसेवा आघाडीचे डी.एम. बावळेकर आणि अपक्ष उमेदवार कुमार शिंदे यांच्यात लढत होणार आहे.


मलकापूर नगरपालिकेचं नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. इथं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आर्यन कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपनं तेजस सोनावलेंना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून अक्षय मोहिते थेट नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत.


पाचगणी मध्ये आमदार मकरंद पाटील यांच्याकडून दिलीप बगाडे यांना समर्थन देण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष संतोष कांबळे रिंगणात आहेत. पाचगणीचं नगराध्यपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे.


कराडमध्ये भाजपनं विनायक पावसकर, काँग्रेसनं झाकिर पठाण यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही विकास आघाडीकडून राजेंद्रसिंह यादव थेट नगराध्यपदाच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी रणजित पाटील देखील रिंगणात आहेत.


मेढा नगरपंचायतीत नगराध्यक्षपदासाठी भाजपनं रुपाली वारागडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं रेश्मा करंजेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, अपक्ष शुभांगी गोरे रिंगणात आहेत.