मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvkar) यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification)  प्रकरणावरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. राज्यात सध्या चोर आणि लफंग्यांचं सरकार आहे. राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करत आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे, असं म्हणत संजय राऊत यांनी नार्वेकरांवर थेट निशाणा साधला आहे.


 संजय राऊत म्हणाले,  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यांच्या संरक्षणाखाली सुरू असलेलं घटनाबाह्य सरकार हे संविधान विरोधी आहे. चोर आणि लफंग्यांचे सरकार ते चालवत आहेत आणि घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती त्यांना संरक्षण देत असेल तर या राज्यामध्ये काय चाललेलं आहे याची कल्पना न केलेली बरी आहे, नार्वेकर सांगत आहेत विधिमंडळाचे अधिकार सार्वभौमत्व आहेत. याचा अर्थ असा नाही की चोरी करून एखाद्याच्या घरात शिरावे आणि त्या घराच्या मालकाने चोराला आणि खुन्याला संरक्षण द्यावं अशी या सार्वबहुमत्त्वाची व्याख्या होत नाही


न्यायालयाने फासावर लटकवले पाहिजे


सर्वोच्च न्यायालयातून फासावर लटकवायचे आदेश आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालय शिक्षा सुनावतं पण फासावर लटकवण्यासाठी जल्लादाची गरज असते ही जबाबदारी आता विधानसभा अध्यक्षांवर आहे. या चाळीस आणि इतर आमदारांना घटनात्मक फासावर लटकवण्याची जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. नार्वेकर चोरांचे सरदार हे म्हणून काम करत आहेत की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करत आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे. चौकीदार चोर आहेत तसे संविधान पिठावर बसलेले चोर आहेत असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये. अगोदरच्या राजपाल आणि या विधानसभा अध्यक्षांनी इतक्या वेळा न्यायालयाचा अपमान केला आहे की त्यांना रोज न्यायालयाने फासावर लटकवले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.


विधानसभा अध्यक्ष उद्या ते खुर्चीवर नसतील तेव्हा...


शिवसेनेचे 40 आमदार मुख्यमंत्र्यांसह आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसह हे लूट करून दुसऱ्या घरात शिरलेले आहेत.  या दरोडेखोरांना विधानसभा अध्यक्षांनी सार्वभौमत्वाच्या नावाखाली संरक्षण देत असतील तर मला वाटतं राहुल नार्वेकर यांचं नाव या अध्यक्ष पदावरून देशाच्या काळ्या कुट्ट इतिहासात लिहिलं गेलं जाईल विधानसभा अध्यक्ष उद्या ते खुर्चीवर नसतील तेव्हा अशा व्यक्तींना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल.