मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत कधीच लुटली नव्हती. काँग्रेस पक्षाने लूट हा शब्द आपल्या तोंडी घातला, असे विधान करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार आगपाखड केली आहे. ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथाने पुण्यात शिवाजी महाराजांचं (Shivaji Maharaj) मराठा साम्राज्य लयास नेलं, शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा यूनियन जॅक ध्वज फडकावला, त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आहेत, असे दुर्दैवाने बोलावे लागते. अन्यथा देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांविषयी अशी भाषा केली नसती, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


देवेंद्र फडणवीस कोणता इतिहास सांगत आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी लढत आहोत आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता. मालवणमध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. हा पुतळा पडला नाही तर तुम्ही पाडला आहे. ज्यांच्यामुळे हा पुतळा पडला त्यांना तुम्ही अटक करु शकत नाही. कारण ते तुमच्या पेशवाईचे शिलेदार आहेत, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली. या टीकेला आता भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल. 


देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?


"छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का?”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.


सुरतेची लूट हे शिवरायांनी मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी टाकलेलं पाऊल: इंद्रजीत सावंत


देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, सुरतेची लूट हे मध्ययुगातील मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी टाकलेले पाऊल होते. स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी या संपत्तीचा वापर करण्यात आला, हा इतिहास आहे. पण देवेंद्र फडणवीस आता खोटा इतिहास सांगत आहेत. ही त्यांची राजकीय रणनीती असावी.श्री शिवरायांनी सुरतेच्या केलेल्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोर येथे समजली होती. पण नागपूरच्या फडणवीसांना अजून ती उमजलेली नाही, अशी टिप्पणी इंद्रजीत सावंत यांनी केली.



आणखी वाचा


'शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले...