मुंबई: ऱाजकोट किल्ल्यावर काल जो काही प्रकार घडला ती गुंडगिरी होती. हा गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार आहे आणि तो भाजपच्या गुंडांनी केला. त्यामध्ये खासदार, आमदार असतील त्यांची नावे मला घ्यायची नाहीत. मात्र, या प्रकाराबद्दल  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे. ते पोलिसांना सुरक्षा देऊ शकले नाहीत, सन्मान देऊ शकले नाहीत आणि प्रतिष्ठा राखू शकले नाहीत. भाजपच्या गुंडांनी पोलिसांवर हल्ला करणे बाकी होते. हा पोलीस दलावर थुंकण्याचा प्रकार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.


मात्र, देवेंद्र फडणवीस हे राजकोट किल्ल्यावरील नारायण राणे यांच्या कृतीचे समर्थन करतात. काय तर म्हणे, नारायण राणे हे आक्रमकच बोलतात, ही त्यांच्या बोलण्याची स्टाईल आहे. मग आम्हीही आक्रमक बोलतो, आमच्यावर गुन्हे का दाखल करता?, असा सवाल राऊत यांनी विचारला. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्राची संस्कृती उद्ध्वस्त झाली. भाजपने राष्ट्रवादाच्या नावाखाली व्यभिचार, अनाचार आणि भ्रष्टाचार केला. शिवरायांच्या पुतळ्याच्या नावाखाली हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. हेच पैसे निवडणुकीत वापरले गेले. आयएनएनस विक्रांत या भारतीय युद्धनौकेबाबतही भाजपने भ्रष्टाचार केला होता. भाजपने विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली 58 कोटी रुपये खाल्ले. याप्रकरणातील चोर मुलुंडला बसला आहे. त्याला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री होताच सर्वात पहिले आयएनएस विक्रांत घोटाळ्याची चौकशी बंद केली, असा आरोप संजय राऊत यांनी केला.


राजकोट किल्ल्यावरील राडाप्रकरणी 42 जणांवर गुन्हे दाखल


राजकोट किल्ल्यावर काल घातलेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. राडा करणाऱ्या दोन्ही बाजूच्या 42 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 42 जणांसह शेकडो अज्ञातांवर देखील गुन्हे दाखल. कलम 121 (2), 189 (2), 191(2), 190 118 (2),  223, 3, 37 (1) 37 (3) नुसार हे  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


राजकोट किल्ल्यावर फॉरेन्सिक टीम दाखल


राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी किल्ल्यावर फॉरेन्सिक टीम आली आहे. ही फॉरेन्सिक टीम कोल्हापूरवरुन आली आहे. या टीमकडून सध्या घटनास्थळाची पाहणी केली जात आहे.


आणखी वाचा


राणे साहेब नेहमी आक्रमक असतात, ती त्यांची बोलण्याची पद्धत आहे; कोणाला धमक्या देतील असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस