Sanjay Raut on Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणी हिंसाचार (Parbhani Violence) प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सोमवारी परभणी दौऱ्यावर आले होते. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यानंतर राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलले, असा हल्लाबोल त्यांनी केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी द्वेष पसरवण्यासाठीच परभणीत आले, असे प्रत्युत्तर दिले होते. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बीड आणि परभणी प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे. परभणी, बीडमधल्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला कलंक लावला आहे. या घटनांशी संबंधित जे आरोपी आहेत, त्यांच्याशी संबंधित लोक तुमच्या मंत्रिमंडळात आहेत, याचे उत्तर देण्याचे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले?
आपण न्यायाच्या गोष्टी करत आहात, द्वेषाच्या गोष्टी करत आहात. आपण स्वतः एकदा बीडला जा. गृहमंत्री म्हणून आपण बीडला गेलात का? राहुल गांधी परभणीला गेले, यामुळे आपले पित्त का खवळले? राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत. भारतीय संविधानाने त्यांना जो दर्जा दिलेला आहे, तो कॅबिनेट मंत्र्याचा आहे. तो दर्जा त्यांना नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस यांनी दिलेला नाही. मोदींकडे बहुमत नाहीये, ते कुबड्यांवर आहेत. आपण गृहमंत्री म्हणून परभणीत जायला पाहिजे होते. पण आपल्याला भीती वाटते. आपण तिथे गेला तर सैन्य घेऊन जाल, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
राहुल गांधी महाराष्ट्रात आले, त्याबद्दल आभार
ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी महाराष्ट्रात आले, मी त्यांचे आभार मानतो. राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रात काय सुरु आहे, हे देश पातळीवर पसरले आहे. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस कोठडीत हत्या झाली. राहुल गांधी बरोबर बोलले आहेत. ती हत्याच आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवी. त्यांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी सरकारची होती. ज्यांनी या हत्या घडवल्या त्यांना आपण पाठीशी घालत आहात.
भुजबळांना दूर केले, पण हत्येचा संशय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवलं
ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे ते आपल्या मंत्रिमंडळात आहेत. आपण मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना दूर करू शकतात. पण एका हत्येचा संशय असणार्यांना तुम्ही मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही. कारण तुमचे जातीचे राजकारण आहे. तुम्ही एक समाज वापरून घेत आहात. संतोष देशमुख यांच्या खुनाच्या कारस्थानात ज्यांचा संशयास्पद हात आहे, अशी व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात नको, अशा घोषणा अजित पवारांच्या समोर देण्यात आलेल्या आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय.
आणखी वाचा