Sanjay Raut slams BJP: मुंबईतील भाजपचे आमदार पराग शाह यांनी दोन दिवसांपूर्वी ज्या रिक्षावाल्याला मारहाण केली होती, तो रिक्षावाला मराठी होता, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपचे आमदार पराग शाह (MLA Parag Shah) रस्त्यावर उतरुन एका मराठी रिक्षावाल्याला मारतात. तो रिक्षावाला चुकला असेल, त्याने नियम मोडला असेल. पण भाजपचे (BJP) सरकार रोज नियम मोडत आहे. भाजपने नियमबाह्य पद्धतीने मुंबई अदानीला देऊन टाकली. मग पराग शाह जाऊन अदानींची कॉलर पकडणार आहेत का, त्यांच्यात एवढी हिंमत आहे का? पराग शाह हे देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मिठागाराची आणि धारावीची जमीन अदानींना दिल्याबद्दल जाब विचारणार आहेत का? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला. ते सोमवारी मुंबई आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पदपथांवर अतिक्रमण होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. वल्लभबाग लेन आणि खौगली भागात अनेक दुकानदारांनी पदपथावर खुर्च्या आणि बाकडे ठेवून अतिक्रमण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यासाठी भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांनी शनिवारी या भागाला भेट दिली होती. पराग शाह महात्मा गांधी रोडवर (M G Road) असताना एक रिक्षावाला राँग साईडने रिक्षा चालवताना त्यांना दिसला. त्यामुळे पराग शाह प्रचंड संतापले. याच संतापाच्या भरात पराग शाह यांनी रिक्षावाल्याच्या कानाखाली लगावली होती. रिक्षावाल्याच्या कानाखाली मारतानाचा पराग शाह यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. जर रिक्षा चालकाने नियम मोडला असेल तरी आमदाराने कायदा हातात घेण्याचे अधिकार आहे का? असा सवाल काहीजणांनी विचारला होता. परंतु, काही लोकांनी पराग शाह यांच्या कृतीचे कौतुक केले होते. मात्र, पराग शाह यांनी ज्या रिक्षावाल्याला मारहाण केली होती, त्याचे नाव समोर आले नव्हते. परंतु, आता संजय राऊत यांनी मारहाण झालेला रिक्षावाला मराठी असल्याचा दावा केला आहे. परिणामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
MNS and Thackeray camp alliance: मनसे-ठाकरे गटाचं जागावटप कधी जाहीर होणार? संजय राऊत म्हणाले...
या पत्रकारपरिषदेत संजय राऊत यांनी ठाकरे गट आणि मनसेच्या जागावाटपाबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मुंबई, नाशिक, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळून एकत्र लढत आहेत. या महानगरपालिकांमधील शिवसेना-मनसेच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. जागावाटपाच्या यादीवर आज शेवटचा हात फिरवला जाईल. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे आणि धुमधडाक्यात केली जाईल. राज आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमीलन झाले आहे, ते एकत्रित लढत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा