Sanjay Raut : काँग्रेसचे नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भाजपवर निवडणूक चोरीचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधींनी 'इंडियन एक्सप्रेस'मधील लेखातून पाच टप्प्यांमध्ये संपूर्ण यंत्रणेचा आराखडा मांडला आहे. यात निवडणूक आयुक्तांची एकतर्फी निवड, बनावट मतदारांची नोंदणी, खोटं मतदान, टार्गेट बुथ रिगिंगसह CCTV फुटेज व इतर महत्त्वाचे पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सनसनाटी दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही अमित शाह यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे, अशा पद्धतीने ते लढले. आपल्या लक्षात आले असेल की, वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी हे पिछाडीवर होते. त्यानंतर मतमोजणी थांबविण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरील लाईट घालवण्यात आली. त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला. डाटा उडाला आणि नवीन मशीन आणण्यात आल्या. दिल्लीतून यंत्रणा हलली. वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता. दोन तास या लोकांनी गोंधळ घातला, मतमोजणी हायजॅक केली.
राहुल गांधी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर नेला
संजय राऊत पुढे म्हणाले की, तोच प्रकार महाराष्ट्रात झाला. राहुल गांधी आणि आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विजय चोरलेला आहे, हायजॅक केलेला आहे. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली. निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले. ईव्हीएम मशीनची तर समस्या आहेच. शेवटच्या दोन तासात 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढविण्यात आले. राहुल गांधी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर नेला. त्यामुळे हिंदुस्तानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे जगाला कळले. जगात नरेंद्र मोदी आणि आपल्या सरकारला अपमान सहन करावा लागतोय. हे लोक लोकशाही मानत नाहीत, हे लोक हुकूमशाही प्रवृत्तीने काम करतात. हे लोक निष्पक्ष निवडणूक करत नाहीत. जगात नरेंद्र मोदी आणि देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या