Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघा बंधूंनी पुन्हा एकत्र यावं, अशा चर्चा मागील दोन दिवसांपासून सुरू आहेत. यावर दोन्ही पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी "ठाकरे बंधूंनी एकत्र यावं" असे बॅनर्स झळकले आहेत. मात्र, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, आणि चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मात्र युतीविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे आणि ठाकरे गटातील युतीचा विषय अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत या मुद्द्यावर कोणीही सार्वजनिकरित्या बोलू नये," अशा सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं भाष्य केलंय.
संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंनी हात पुढे केला आहे आणि त्याला प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. आपण येथेच थांबायला हवे. काही दिवस जाऊ द्या. मनसे प्रमुख मुंबईत नाहीत. त्यांना मुंबईत येऊ द्या. त्यानंतर आपण सगळे चर्चा करू. रोज यावर चर्चा करून त्या विषयाचे गांभीर्य का घालवायचे? लोकांच्या मनातल्या भावना आहेत. हा विषय जिवंतच राहणार आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीने चर्चा करण्याची गरज नाही. या दोघांचे नाते काय? हे मला माहित आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात. उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत. आपल्याकडून महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचे आहे त्यांनी यावे. रिपब्लिकन गटाचे नेतेदेखील एक होण्याच्या विचारात आहेत, असे त्यांनी म्हटले.
मी तर दोन्ही घरचा पाहुणा
संजय राऊत पुढे म्हणाले की, दोन भाऊ जर भेटणार असतील तर भेटू द्या. आम्ही त्यांच्यासोबत असू. आम्ही कुठे जात आहोत? मी तर दोन्ही घरचा पाहुणा, असा मिश्कील टोला त्यांनी यावेळी लगावला. ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आम्ही बराच काळ एकत्र राहिलेलो आहोत. राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले. महाराष्ट्रातल्या राजकारणातील कटुता भारतीय जनता पक्षाने निर्माण केली आहे. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पाहिले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पवार त्यांच्या संस्थात्मक कामासाठी एकत्र आले
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, कोणाच्या पोटात दुखतंय? त्यांच्याकडे एकत्र येण्यासाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट आहे. बारामती प्रतिष्ठान आहे. विद्या प्रतिष्ठान आहे. रयत शिक्षण संस्था आहे. ते अद्याप राजकीय दृष्ट्या एकत्र आले आहेत का? हे मला माहीत नाही. आजही शरद पवार साहेब हे त्यांचा पक्ष मजबूत करणासाठी महाराष्ट्र पालथा घालत आहेत. सुप्रिया सुळे या पक्षाच्या बांधणीसाठी फिरत आहेत. जयंत पाटील हे त्यांच्या पक्षाच्या बळकटीकरणासाठी जीवाचे रान करताय. पवार त्यांच्या संस्थात्मक कामासाठी एकत्र आलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या मनात कुठलाही अहंकार नाही
महाराष्ट्रात ठिकठिकाणी होल्डिंग्स लागत आहेत. लोक म्हणतात की, ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे, अशी आमची भावना आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, त्या लोक भावनेचा विचार करूनच उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मला रस्त्यावरून जाताना लोक सांगत आहे की, साहेब दोन भावांनी एकत्र आले पाहिजे. ही लोकभावना आहे. ही सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि आम्ही ती समजून घेतलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनात कुठलाही अहंकार नाही. कुठलीही कटुता नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगत आहे, असे त्यांनी म्हटले.
राजकीय भांडणामुळे मैत्री तुटत नाही
आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या सोबतची मैत्री संपुष्टात आल्याचे जाहीर केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अशी मैत्री संपुष्टात येत नाही. राज ठाकरे आणि माझी मैत्री संपुष्टात आली का? आम्ही एकमेकांवर सातत्याने टीका केली. आरोप-प्रत्यारोप केले. त्यांनी माझ्या नकला केल्या, आम्ही देखील केल्या. ही राजकीय टीकाटिप्पणी असते. मिस्टर शेलार आणि राज ठाकरे यांच्यात कोणत्या प्रकारचे भांडण आहे? त्याला काही व्यक्तिगत किनार आहे का? राजकीय भांडणामुळे मैत्री तुटत नाही, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
राज ठाकरे शाळकरी मुलांप्रमाणे तडजोड करतील असं वाटत नाही; बंधूंच्या युतीवर मंत्री सामंत म्हणतात...