पाटणा : बिहारमध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून राजकीय नेतेमंडळी कामाला लागली आहे. निवडणुकांच्या अनुषंगाने रणनीती आखायला आणि पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सभा आणि कार्यक्रमातून जनतेला आवाहन करत आहेत. राज्यातील बक्सर जिल्ह्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge) यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या सभेसाठी अपेक्षित गर्दी न जमवता आल्याने काँग्रेसकडून (Congress) पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर कारवाई करण्यात आलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बक्सरचे जिल्हाध्यक्ष मनोज कुमार पांडे यांना पदावरुन निलंबित केलं आहे. 

बक्सर येथे 20 एप्रिल रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांच्या सभेसाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली होती. मात्र, सभेच्या ठिकाणी लोकांची संख्या कमी होती, अपेक्षित गर्दी या सभेला काँग्रेसला जमवता आली नाही. त्यावरुन, पक्षातही कुरबूर झाल्याने पक्षाच्या राज्यातील वरिष्ठांकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रदेशाध्यक्षांनी बक्सरच्या जिल्हाध्यक्षांचे तत्काळ निलंबन केले आहे.  आता, लवकरच बक्सर जिल्हाध्यक्षपदी नवीन नियुक्ती केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कारण, पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणीनीती आणि पक्षाची ध्येय धोरणं ठरवताना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून हा निर्णय घेतला जाणार आहे. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बक्सर येथील दलसागर स्टेडियममध्ये आयोजित जनसभेला संबोधित केले. जय बापू, जय भीम, जय संविधान रॅलीचे याठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खर्गेंनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला. नितीशकुमार आणि भाजप हे संधीसाधू आहेत. नितीशकुमार हे सत्तेत येण्यासाठीच सातत्याने दलबदलूपणा करत आहेत, असे खर्गेंनी म्हटलं. तर, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि आरएसएसवरही त्यांनी टीका केली. नरेंद्र मोदी हे खोटं बोलणाऱ्यांचा कारखाना, असल्याची टीकाही खर्गेंनी केली. 

काँग्रेससोबत महाआघाडी होणार का?

बिहारमध्ये यंदाच्यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होत असून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे, येथील प्रादेशिक पक्षांसोबतच भाजप आणि काँग्रेसनेही कंबर कसली आहे. राष्ट्रीय जनता दलाकडून स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात की महाआघाडी उदयास येते. राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये निवडणुका लढवल्या जात आहेत, त्यामुळे महाआघाडीचा निर्णय देखील त्यांचाच असणार आहे. दुसरीकडे, नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाची भाजपसोबत युती आहे. मात्र, राजद आणि काँग्रेससह महाआघाडी होणार का, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.  

हेही वाचा

माधव भंडारींकडून 26/11 च्या हल्ल्यासंदर्भाने राष्ट्रवादीवर आरोप; अमोल मिटकरींची बोचरी टीका