Sanjay Raut on Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हा हिंदुत्त्वाचा मूर्तिमंत चेहरा आहे. त्यांना बघितले तर शंकराचार्य यांची आठवण येते. ते शिवसेनेचे शंकराचार्य आहेत, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. आज नाशिकमध्ये शिवसेनेचे निर्धार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत 'आम्ही इथेच' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यात राजन विचारे, राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे हे सहभागी झाले होते . यात संजय राऊत यांनी त्यांना विविध प्रश्न विचारले.
संजय राऊत : तुम्ही पहिली शिवसेनेची मारामारी कधी केली?
राजन विचारे : आपला जन्मच संघर्षांतून तयार झाला, शिवसेना नावामुळे ऊर्जा मिळाली.
संजय राऊत : अरविंद सावंत सर्वसामान्य कार्यकर्ता ते नेते झाले, हा प्रवास मी जवळून पहिला. अरविंद सावंत तुम्हाला शिवसेनेचे वेड कसे लागले?
अरविंद सावंत : एक संपादक आपली मुलाखत घेतो, हा विलक्षण योग आहे. शिवसेना स्थापन झाली, तेव्हा शाळेत होतो. 11 वीत असताना मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलन सुरू केले होते. त्याचे आश्चर्य आणि अभिमान वाटायचा. आपल्या मनातील विचार साहेब, मांडत आहेत, असे वाटले. शाळेत अभ्यास करत असताना खालच्या मजल्यावर काँगेसची सभा सुरू होती. आम्ही वरून शिवसेना जिंदाबादची घोषणा दिली. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी आम्हाला मारले.
यानंतर संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत खैरे आलेत, हिंदुत्वाचा मूर्तिमंत चेहरा आहे. त्यांना बघितले तर शंकराचार्य याची आठवण येते ते शिवसेनेचे शंकराचार्य आहेत. औरंगजेबची कबर आहे, ते तिथून येतात. कडवट शिवसैनिक आहे. हा कडवटपणा आला कुठून?
चंद्रकांत खैरे : मी मार्मिक मुळे शिवसेनेत आहे. वडील मार्मिक वाचायचे त्यामुळे शिवसेनेत आलो. शाखा स्थापन केली. साहेबांना भेटायचे होते, मला जाऊ देत नव्हते. मी घुसखोरी केली, साहेबांना लोटांगण घातले. साहेबांना बोललो तुम्ही मराठवाड्यात या. ते म्हणाले तुम्ही शिवसेना वाढवा.
संजय राऊत : बाळासाहेब ठाकरे यांची पहिली थाप कधी पडली?
चंद्रकांत खैरे : 1978 साली
संजय राऊत : राजन विचारे ठाण्याचे आहेत. सध्या ठाण्याविषयी चर्चा आहे. तुम्ही इथे का? तुम्हाला दबाव आला असेल, मंत्रिपदाचे प्रलोभने असतील, ठाणे रिकामे झाले तुम्ही इथे का?
राजन विचारे : ठाण्याला गद्दारी नवी नाही. प्रकाश परांजपे महापौर पदासाठी उमेदवार होते तेव्हाही गद्दारी झाली. 3 वर्षांपूर्वी जी गद्दारी झाली, ती 133 देशांनी बघितले, असे ते सांगतात. ते काही भूषणावह नाही. मोठं-मोठे नेते ठाण्यात होवून गेले.
संजय राऊत : तुम्ही आनंद दिघेंना जवळून पाहिले त्यांना हायजॅक केले जात आहे का?
राजन विचारे : दिघे साहेब 49 व्या वर्षी गेले. ते तुरुंगात गेले तेव्हा काँग्रेसचे राज्य होते. पण ते कधी म्हणाले नाही की, मला बाहेर काढा. त्यावेळी त्यांचे एक वाक्य होते, गद्दाराला क्षमा नाही. त्यावेळी प्रभाकर हेगडे यांनी जेलमध्ये निरोप पाठवला. पण, त्यालाही त्यांनी उत्तर दिले की, मी माझ्या मतावर ठाम आहे.
संजय राऊत : राजाभाऊ वाजे शिवसेनेचे खासदार आहेत. जेव्हा शिवसेना फुटणार अशी चर्चा होते, तेव्हा वेगवेगळे नावं येतात. तुमचे नाव का येत नाही?
राजभाऊ वाजे: आमची तिसरी पिढी राजकारणात आहे. आम्ही निष्ठेशी तडजोड केलेली नाही.
आणखी वाचा