मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप अजित पवारांचा (Ajit Pawar) काटा काढणार आहे. निवडणूक संपल्यानंतर शिंदे गटाचाही काटा भाजपकडून काढला जाईल. भाजपवर (BJP) कोणीही विश्वास ठेऊ नये. ते आपल्या जवळच्या मित्रांचाच काटा काढतात. याचा अनुभव आम्ही आणि भाजपच्या अन्य मित्रपक्षांनी घेतला आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वी अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीर प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, अजित पवार यांना दूर लोटण्याचा कार्यक्रम आता भाजपने सुरु केला आहे. त्यामध्ये मिंधे गटाचे काही नेते सामील आहेत. अजित पवार यांना बाहेर काढलं तर जास्त जागा लढवता येतील, हे यामागील राजकारण आहे. अजित पवार काकांशी बेईमानी करुन आणि इतका मोठा धोका पत्कारुन भाजपसोबत आले. पण आता त्यांची गरज संपली आहे. त्यामुळे अजित पवार यांना अडचणीत आणणारी वक्तव्यं आणि भूमिका भाजप व शिंदे गटाकडून घेतल्या जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.


एकनाथ शिंदेंनाही निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्याच्या हालचाली सुरु


पहिला बळी हा अजित पवारांचा जाणार आहे. मात्र, भविष्यात महाराष्ट्रातील नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे राहू नये, यासाठीही भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत हालचाली सुरु केल्या आहेत. दिल्लीतून भाजपच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीचा सगळा खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकीचा खर्चही एकनाथ शिंदे यांच्याकडून करुन घेतला जात आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हे याच पैशांवर टिकून आहे. त्यासाठी राज्यात लुटमार सुरु आहे. एकनाथ शिंदे यांना हजारो कोटी रुपये गोळा करुन त्या थैल्या दिल्लीतील गुजराती व्यापारी मंडळाला द्याव्या लागतात, असेही संजय राऊत यांनी म्हटले.


अजित पवारांच्या एक्झिटसाठी भाजप-शिंदे गटाचा चक्रव्यूह?


विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महायुतीमध्ये जोरदार चढाओढ सुरु आहे. तिन्ही पक्ष आपापल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत 160 जागा लढवण्याचा चंग बांधल्याने शिंदे गट आणि अजितदादा गटापैकी एकाला जागावाटपात नमते घ्यावे लागणार, हे स्पष्ट आहे. यादृष्टीने आता भाजप आणि शिंदे गटाने जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास आपल्याला अधिकाअधिक जागा लढवता येतील, अशी रणनीती आखल्याची माहिती 'दैनिक लोकसत्ता'ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 


महायुतीमध्ये अजित पवार यांची कोंडी व्हावी, असे डाव जाणीवपूर्व टाकले जात आहेत. जेणेकरुन भाजप आणि शिंदे गटाचे कट्टर हिंदुत्त्व आणि विरोधकांना नेस्तनाबुत करण्याची पद्धत अजित पवार यांना मान्य नसेल तर त्यांना महायुतीमधून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असेल, असा अप्रत्यक्ष संदेश भाजप आणि शिंदे गटाकडून दिला जात असल्याची चर्चा आहे.


आणखी वाचा


कट्टर हिंदुत्त्व मान्य नसेल तर महायुतीमधून बाहेर पडा; अजित पवारांच्या एक्झिटसाठी भाजप-शिंदे गटाचा चक्रव्यूह?