Sanjay Raut on Sharad Pawar : जम्मू-कश्मीरमधील हल्ल्यानंतर भारताने ठोस प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकारने जबाबदारी टाळत सैन्यावर सर्व भार टाकल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. "प्रत्युत्तर देण्यासाठी केवळ सैन्य नव्हे, तर राजकीय इच्छाशक्तीही आवश्यक असते," असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. तर शरद पवार यांनी सरकारला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी त्यांना भूतकाळाची आठवण करून दिली. "२६/११ च्या हल्ल्यानंतर आर.आर. पाटील आणि विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला गेला होता. जर तेव्हाचे राजीनामे योग्य होते, तर आज अमित शाह यांचा राजीनामा का नको?" असा थेट सवाल राऊत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारला आहे.  

संजय राऊत म्हणाले की, सर्वात पहिले गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. चुन चुन के मारेंगे हे प्रत्येक वेळेला बोलतात. काँग्रेसच्या काळात सुद्धा गृहमंत्री हेच बोलत होते, आता देखील तुम्ही हेच बोलत आहात. भारतीय जनता पक्ष आणि भाजपचे मंत्री हे काँग्रेस पक्षाची भ्रष्ट नकल आहे. कार्बन कॉपी नाही तर भ्रष्ट नकल आहे. अमित शह बोलत आहेत चुन चुन के मारेंगे,  कोणाला सोडणार नाही. मुळात जे घडलं आहे त्याला जबाबदार गृहमंत्री आहेत. ही जबाबदारी घेऊन आम्ही शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते राजीनामा देत नसतील तर प्रधानमंत्री त्यांना पदावरून हटवले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. 

तुम्ही सरकारच्या चुकांबरोबर आहात का?

शरद पवारांनी आपला सरकारला पाठिंबा असल्याचा वक्तव्य केलं. याबाबत संजय राऊत म्हणाले की,  सरकार बरोबर म्हणजे तुम्ही सरकारच्या चुकांबरोबर आहात का? देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातसरकारने ज्या चुका केल्या आहेत त्याच्यावर कोणी बोलायचं? शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब मंत्रिमंडळात होते. शिवराज पाटील यांनी बॉम्बस्फोट घडवले नव्हते ना, पण त्यांची नैतिक जबाबदारी होती. काँग्रेसने शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता.  आम्ही सरकारच्या बरोबर आहेत काय असं कोण बोलत आहे? बोलू द्या.  आम्ही सरकारच्या बरोबर आहोत. पण युद्ध तर सुरू करा. या सगळ्या गोष्टींचे सरकार राजकारण करत आहे. सरकारच्या बरोबर आहोत. पण, 24 तासात पंतप्रधान बिहारला प्रचाराला गेले याचे शरद पवार साहेब समर्थन करणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

ते जनतेच्या भावनांशी खेळताय 

संजय राऊत पुढे म्हणाले की. काल पंतप्रधान मुंबईत आले. नऊ-दहा तास फिल्मी सिताऱ्यांबरोबर रमले. मुंबई मनोरंजनाची राजधानी आहे हे आम्हाला माहिती आहे. शाहरुख खान, आमिर खान, ही नटी, ती नटी, तो नट याचं समर्थन आम्ही करायचा आहे का? सैन्यावर सगळी जबाबदारी टाकली आहे. इंदिरा गांधी यांनी जबाबदारी सैन्यावर टाकली नाही. निर्णय दिला, आदेश दिला मला युद्ध करायचे आहे. याला बोलतात राजकीय इच्छाशक्ती. तुमच्याकडे आहे का? अशा सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचा समर्थन. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर पण दिसत नाही. एखाद्या पंतप्रधानांनी हा कार्यक्रम रद्द केला असता. बिहारचा प्रचार दौरा रद्द केला असता. पण ते फिरत आहेत, त्याच्यावरती आम्ही बोलणार आहोत. ज्यांना सरकारचं समर्थन द्यायचं आहे, या गोष्टीवर त्यांनी द्यावे. ते जनतेच्या भावनांशी खेळत आहेत, असा हल्लबोल त्यांनी केला.  

गरज नसताना अमित शाह यांचे समर्थन करू नये

गृहमंत्री अमित शाह या सर्व घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा पंतप्रधानांनी घ्यायला हवा. तुम्ही शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता. आर आर पाटील यांचा राजीनामा घेतला होता. मग आर आर पाटील यांचा राजीनामा पवार साहेब यांनी का घेतला होता? जर त्यांना अमित शाह यांचा राजीनामा नको मग महाराष्ट्रातल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर लोक भावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले आर आर पाटील यांचा राजीनामा घेतला. काँग्रेसने विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला. हे विसरू नका आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे. मी इतिहासाला धरून बोलत आहे, या जनभावना आहेत.  त्यांनी काही गरज नसताना अमित शाह यांचे समर्थन करू नये, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

India-Pakistan Tension : भारत आक्रमक झाल्यानंतर पाकिस्तानची टरकली! पेशावर, एबटाबाद, स्वातसह 29 जिल्ह्यात लावले एअर सायरन