India-Pakistan Tension : भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात भीतीचे वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी मंत्र्यांकडून दररोज असे विधान केले जात आहे की, भारत कधीही हल्ला करू शकतो. याच पार्श्वभूमीवर आता नियंत्रण रेषेपासून (LoC) अनेक किलोमीटर दूर असलेल्या पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा (KPK) प्रांतातील 29 जिल्ह्यांमध्ये सायरन प्रणाली बसवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या जिल्ह्यांमध्ये पेशावर आणि एबटाबाद यांचा देखील समावेश आहे.
खैबर पख्तूनख्वा सरकारच्या नागरिक संरक्षण विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि सिव्हिल डिफेन्स अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, त्यांनी आपत्कालीन इशाऱ्यांसाठी त्वरित सायरन प्रणाली बसवून त्याचा अहवाल सादर करावा. आदेशानुसार, पेशावर, एबटाबाद, मर्दान, कोहाट, स्वात, डेरा इस्माइल खान आणि बन्नू या मोठ्या शहरांमध्ये प्रत्येकी चार सायरन बसवण्यात येणार आहेत, तर उर्वरित 22 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक सायरन बसवण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये लोअर दीर, चितराल, कुर्रम, नौशेरा, हरिपूर, बाजौर, हंगू, वझीरिस्तान, ओरकजई यांसारख्या भागांचा समावेश आहे.
LoC पासून दूरवरच्या भागात बसवले जाताय सायरन
विशेष म्हणजे हे सर्व जिल्हे नियंत्रण रेषेपासून (LoC) खूप दूर आहेत. काही जिल्हे तर 300 ते 500 किलोमीटर अंतरावर आहेत. तरीसुद्धा त्या भागांमध्ये सायरन बसवले जात आहेत, हे स्पष्टपणे दर्शवते की पाकिस्तानला सतत ही भीती सतावत आहे की, भारत कधीही पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सैनिकी कारवाई करू शकतो.
एअर सायरन बसवण्याचे फोटो समोर
पाकिस्तानच्या बाजौर भागात एअर सायरन बसवण्याचे फोटोही समोर आले आहेत. पाकिस्तान केवळ नियंत्रण रेषेपासून (LoC) अनेक किलोमीटर दूर असलेल्या भागांमध्येच नाही, तर अफगाणिस्तान सीमेवर असलेल्या भागांमध्येही एअर सायरन बसवत आहे. यामागचं कारण असं असू शकतं की, पाकिस्तानला भीती आहे की भारत अफगाणिस्तानच्या दिशेने येऊन पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाकिस्तानी लष्कर घाबरून युद्धसराव (वॉर ड्रिल) देखील करत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या