Sanjay Raut on Amit Shah : अमित शाह यांच्या भाषणात त्यांनी शिवाजी महाराज असा उल्लेख केलेला नाही. त्यांनी शिवाजी, शिवाजी, शिवाजी, असा एकेरी उल्लेख केला आहे. ऐरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते. ते छत्रपती किंवा महाराज आहेत, हे देशाच्या गृहमंत्र्यांना माहित नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे भाजपचे नव्हते. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंना तुम्ही निमंत्रण दिलं नाही. फक्त महाराजांचे जे वंशज भाजपची हाजी हाजी करताय, त्यांनाच तुम्ही निमंत्रण दिले. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे राजकारण पाहून छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे ज्ञान आम्हाला अमित शाह यांच्याकडून घेण्यात इतकी वाईट वेळ आलेली नाही. छत्रपती काय होते? छत्रपतींचा विचार काय होता? त्यांची भूमिका काय होती? महाराष्ट्राने काय केले पाहिजे? वगैरे वगैरे... ज्यांनी छत्रपतींच्या महाराष्ट्रावर औरंगजेबाप्रमाणे सुडाने कारवाया केल्या. ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणारे लोक माना डोलवणार, या राज्यावर इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा दिला
संजय राऊत पुढे म्हणाले की, गेले तीन महिने यांचे लोक औरंगजेबाचे थडगं उखडून टाकण्याच्या विचाराने भारावून गेले होते. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे छावाचे प्रदर्शन केले, त्यातून लोक भडकले. आम्ही ज्याला थडगं म्हणतो, त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर मेघडंबरीसमोर औरंगजेबाची समाधी म्हणत त्याला समाधीचा दर्जा दिला. नकली हिंदुत्ववाद्यांना औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला, यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट काय होणार? मग इतक्या हाणामारी आणि दंगली का घडवल्या? गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला, त्याचा हा परिणाम आहे का? एवढे प्रेम आहे का? महाराष्ट्राच्या शत्रूला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातले वक्तव्य देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आले. छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते. त्यांना खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला पाहिजे होता. छत्रपती शिवरायांचे ढोंगी चाहते, एसंशि असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील त्यांनाही यावर आक्षेप घ्यावासा वाटला नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
अमित शाहांकडून शिवरायांचा अपमान
संजय राऊत पुढे म्हणाले की, अमित शाह यांच्या भाषणात त्यांनी शिवाजी महाराज असा उल्लेख केलेला नाही. त्यांनी शिवाजी, शिवाजी, शिवाजी, असा एकेरी उल्लेख केला आहे. ऐरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते. ते छत्रपती किंवा महाराज आहेत, हे देशाच्या गृहमंत्र्यांना माहित नाही. ते रायगडावर येऊन शिवाजी महाराजांवर महाराष्ट्राला ज्ञान देतात. हे कुठले ज्ञानदेव आम्हाला ज्ञान देणारे? या ज्ञानाची आम्हाला गरज नाही. तुमची जीभ धजावते कशी महाराजांना अरे तुरे करायला? काय करताय देवेंद्र फडणवीस? हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
शाह, फडणवीसांचे राजकारण पाहून छत्रपतींचा आत्मा तळमळत असेल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड जिल्हा दौऱ्यात संभाजीराजे छत्रपती यांना डावलण्यात आले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात रायगडावर कार्यक्रम करत आहात तर सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत. मग दोन्ही गाद्यांच्या वंशाजांना तुम्ही निमंत्रण द्यायला पाहिजे. उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पक्षात आहेत. म्हणून त्यांना बोलवायचे. छत्रपती शिवाजी महाराज हे भाजपचे नव्हते. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना तुम्ही निमंत्रण दिलं नाही. तुम्ही संभाजीराजेंना निमंत्रण दिलं नाही. तुम्ही कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण दिले नाही. फक्त महाराजांचे जे वंशज भाजपची हाजी हाजी करताय, त्यांनाच तुम्ही निमंत्रण दिले. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण पाहून छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल, असा घणाघात देखील संजय राऊत यांनी केला.
आणखी वाचा