मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा कोसळल्याप्रकरणी आणि मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केला.  मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही. त्यामुळं तो जवळजवळ गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला आहे. त्या पुतळ्याचा जिरेटोप तुटलेला आहे, याच्यावरती भाजपचे नेते तथाकथित स्वत: ला हिंदूंचे कैवारी म्हणवणारे नेते, भाजप आणि शिंदे गटातील बोगस शिवभक्ताचंं काय म्हणणं आहे?  असा सवाल संजय राऊत यांनी केला. या मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत शिवपुतळ्याची विटंबना, भाजपच्या लाडक्या उद्योगपती आणि कंत्राटदाराकडून होत असेल तर ती गंभीर आणि चिंतेची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. ते भाजप आणि शिंदे गटाचं नाही कारण शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वाभिमान आणि अभिमान शिकवला आहे तो त्यांच्याकडे गुणभरही उरलेला नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.


लाडक्या उद्योगपतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अपमान हे उघड्या डोळ्यानं पाहत आहेत. आमचे शिवसैनिक तो पुतळा सोडवण्यासाठी गेले मुंबई विमानतळावर तेव्हा, अदानींनी ठेवलेले 200 बाऊन्सर शिवसैनिकांच्या अंगावर चाल करुन येत होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला. हे लोक बाहेर जाऊन हिंदुत्वाच्या नावावर भाषण देतात, अशी टीका देखील राऊत यांनी केली.  


मालवणच्या प्रकरणातील आरोपींना लपवल्याची लोकांना शंका : संजय राऊत


 मुंबई विमानतळाबाहेरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवसेनेमुळं उभा आहे. या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम, आस्था नाही, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रफुल पटेल यांच्यासह अनेक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. शिवरायांचा अपमान करणारे लोक भाजपसोबत आहेत. मालवणच्या पुतळ्यासंदर्भात मुख्य आरोपीला अटक झालेली नाही. ठेकेदार, शिल्पकार फरार झालेले नाहीत तर ते वर्षा बंगल्यावर लपून बसले नाहीत. शिल्पकाराचे फोटो चिल्या, पिल्या टिल्ल्यासोबत पाहतोय त्यांनी तर त्यांना लपवलं नाही ना, असा सवाल मनात येतो, असं संजय राऊत म्हणाले. 


जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वत:चं कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शाहांच्या ताकदीचा वापर करुन पळवून नेतात त्यांनी अशी भाषा वापरु नये, असं संजय राऊत अजित पवार यांच्या रडीचा डाव खेळू नये या वक्तव्यावर म्हटलं. अजित पवारांच्या कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करावा, निवडणुका लढवाव्या. शिंदे आणि अजित पवार यांच्या तोंडी मर्दानगीची भाषा शोभत नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. 


नितेश राणेंच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी राऊत म्हणाले, एक आमदार आहे, त्यांचे वडील शिवसनेते होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आता ते भाजपमध्ये आहेत. ते म्हणतात मशिदीत खुसून मारु, नरेंद्र मोदींना अशा प्रकारची भाषा मंजूर आहे का हे सांगावं असा सवाल राऊत यांनी केला.  मशिदीत घुसून मारण्याची भाषा करणाऱ्यावर काय कारवाई करण्यात आली, असा सवाल राऊत यांनी केला. 


राजकीय लाभासाठी अप्रचार, CSMIA आरोप फेटाळले


छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ CSMIA मुंबई येथे सुरू असलेल्या विकास कामांदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे योग्य आणि पूर्ण संरक्षण करण्यासाठी, पुतळा तात्पुरता झाकण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेले विमानतळ म्हणून अभिमानाने आम्ही ही खबरदारी अत्यंत आदराने आणि काळजीने घेतली आहे, आमच्या वारशाच्या या प्रतिष्ठित प्रतिकाचा आम्हाला आदर आणि अभिमान आहे याची पूर्ण जाणीव ठेवून आम्ही ही खबरदारी घेतली आहे. राजकीय लाभासाठी काही मंडळी करत असलेल्या आरोपांना सत्यता नाही. या प्रतिष्ठित पुतळ्याची अखंडता जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे स्पष्टीकरण CSMIA ने दिले आहे. 


इतर बातम्या : 


Sharad Pawar: वस्ताद आज डाव दाखवणार! 10 वर्षांनी कोल्हापूरच्या गैबी चौकात शरद पवारांची सभा, आणखी दोन बडे मासे गळाला?