Sangram Thopte : काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी अलीकडेच काँग्रेस (Congress) पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी 22 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले होता. आज संग्राम थोपटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच संग्राम थोपटे यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.     

संग्राम थोपटे म्हणाले की, गेल्या चार दिवस तुम्ही चॅनेलवर पाहत होता.  संग्राम थोपटे काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष होतं.  दोन दिवसांपूर्वी माझी भूमिका मी स्पष्ट केली. मला अनेकांनी प्रश्न विचारला तुम्ही काँग्रेस का सोडताय? ही वेळ माझ्यावर काँग्रेसनेच आणली. विखे पाटील मला विधिमंडळात सांगायचे संग्राम निर्णय घे. इतर सहकारी सुद्धा सांगायचे की निर्णय घे. मी त्यांना सांगायचो की, मी निर्णय घेऊ शकत नाही.  किती दिवस अन्याय होतोय, निर्णय घे असे म्हणायचे. मी विचाराला बांधलेला कार्यकर्ता होतो. विधानसभा निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल काही कारणामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.  

काँग्रेस पक्ष तळागाळात वाढवला आणि आज या निर्णयावर पोहोचलो 

संग्राम थोपटे पुढे म्हणाले की, लोकसभेला आम्ही महाविकास आघाडी धर्म पाळला होता. काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केलं. मात्र त्या निष्ठेचे फळ मिळालं नाही.  तळागाळात काँग्रेस वाढविण्याचा काम आम्ही केलं. थोडसं दुःख वाटतंय, खंत वाटते. काँग्रेस पक्ष तळागाळात वाढवला आणि आज या निर्णयावर पोहोचलो आहे. भाजप देशाचा सगळ्यात मोठा पक्ष आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असणारा पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची चालणारी वाटचाल पाहता सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा पक्षप्रवेश करत आहे, असे त्यांनी म्हटले.  

संग्राम थोपटेला काही मिळावं, यासाठी मी आलो नाही

देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत माझा ऋणानुबंध आहे. कामानिमित्त कधीही मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो तरी त्यांनी कधी कुठल्या पक्षाचा म्हणून बघितलं नाही. त्यांनी वेळोवेळी मला मदत केली आहे.  त्यांचं काम मी जवळून पाहिलं आहे. एकदा शब्द दिला की ते पडू देत नाही.  विखे पाटील तुम्ही बऱ्याचदा मला सांगायचे. पण, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. मी वेगळ्या पक्षात होतो. विचारधारा वेगळ्या होत्या. पण, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत केली. हा स्वाभिमानी मावळा आहे. संग्राम थोपटेला काही मिळावं यासाठी मी आलो नाही.  मी आभार मानतो, आज भाजपने पक्षप्रवेश दिला. भाजपचं काम इमानीइतबरी पुढे करेल, हा शब्द मी देतो. जे काम काँग्रेसचं आम्ही केलं. त्याच पद्धतीने भाजपचं काम येत्या काळात करू, असेही संग्राम थोपटे यांनी म्हटले.  

आणखी वाचा 

Ramesh Adaskar: बीडमध्ये शरद पवारांच्या पक्षाला खिंडार; रमेश अडसकर अजित पवारांच्या पक्षात करणार प्रवेश, विधानसभेपासून आता तिसरं पक्षांतर