Samruddhi Mahamarg : नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी–आमणे या 76 किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटनानंतर मुंबई ते नागपूर हा एकूण 701 किमीचा समृद्धी महामार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या महामार्गावर देशातील सर्वात मोठा 08 किमी लांबीचा हायटेक बोगदा उभारण्यात आला आहे. तसेच, वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सर्वाधिक उंच खांबांवरील पूल, 32 मोठे पूल, 25 इंटरचेंज आणि 6 किमी लांबीचे ओव्हरपास देखील या महामार्गावर तयार करण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

समृद्धी महामार्गाच्या बोगद्यात डेन्मार्कच्या धर्तीवर स्प्रिंकल्स बसविण्यात आले आहेत. एखाद्या गाडीने पेट घेतला आणि 60 अंशांपेक्षा जास्त तपमान वाढले तर पाण्याचे फवारे सुरु होणार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाहन चालवित असताना पाण्याची फवारणी करण्यात आली.

बोगद्याच्या भिंतींना पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन

हा हायटेक बोगदा 17.5 मीटर रुंद आणि 9 मीटर उंच असून, यात एकूण तीन लेन आहेत. प्रवासी येथे ताशी 100 किलोमीटर वेगाने सहज प्रवास करू शकतात. बोगद्याच्या भिंतींना पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन देण्यात आले असून, त्यावर लावण्यात आलेल्या लाइट रिफ्लेक्टिंग पटलांमुळे रस्त्यावर दिव्यांचा लखलखाट निर्माण होतो. दर 300 मीटर अंतरावर एक अशा प्रकारे एकूण 26 क्रॉस पॅसेज देण्यात आले आहेत. अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना या पॅसेजच्या माध्यमातून बोगद्याबाहेर सुरक्षितपणे बाहेर पडता येते.

Continues below advertisement

तापमान 60 अंशांच्या वर गेलं तर पाण्याचे फवारे सुरु होणार

प्रत्येक 90 मीटर अंतरावर अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे. एखाद्या वाहनाला आग लागल्यास आणि बोगद्यातील तापमान 60 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास, अ‍ॅटोमॅटिक स्प्रिंकलर यंत्रणा आपोआप सुरू होतात. देशात प्रथमच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान विशेषतः डेन्मार्कमधून मागवण्यात आले आहे. या बोगद्यात 24 मीटर लांबीचे एकूण 286 झोन असून, दोन्ही टनेल मिळून एकूण 572 झोन तयार करण्यात आले आहेत. बोगद्यामध्ये एकूण 100 डबल अ‍ॅक्सल रिव्हर्सेबल व्हेंटिलेशन फॅन्स बसवण्यात आले आहेत. यामुळे हवा खेळती राहते आणि वाहनांमधून निर्माण होणारा धूर बाहेर फेकला जातो, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायक होतो.

एकनाथ शिंदे यांच्या हाती स्टेअरिंग

समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी समृद्धी महामार्गावरून साधारणतः 18 किलोमीटरचा एका बाजूने प्रवास केला.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती जाताना गाडीच स्टेअरिंग होतं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती येताना गाडीचे स्टेअरिंग असल्याचे पाहायला मिळाले. अजित पवारांनी मात्र मागच्या सीटवर बसून प्रवासाचा आंनद घेत गाडीचे स्टेअरिंग हाती घेण्याच्या स्पर्धेत आपण नाहीच हे कृतीतून दाखवून दिले. 

आम्हाला गाडी चालवण्याची सवय, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 

या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना प्रश्न विचारला असता आम्हाला गाडी चालवण्याची सवय आहे. आम्ही एकमेकांच्या गाडीमध्ये देखील बसतो, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रवासाच्या दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला. येथे सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे, त्या बोगद्याची देखील पाहणी केली. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर थांबून पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती देखील जाणून घेतली.

दरम्यान, समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा 76 किमी आहे, 5 बोगदे आहेत, सर्वात जास्त लांबीचा बोगदा देखील आहे. 60 डिग्री तापमान झाल्यास आपोआप येथे पाणी सुरू होते आणि तापमान कमी झाल्यास आपोआप बंद होते, सगळे बोगदे एकमेकांना जोडलेले आहेत. यात 200 मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण करण्याची तयारी आपण केली आहे. 22 ठिकाणी सुविधा केंद्र असतील. हा स्मार्ट रोड म्हणून विकसित करण्यात येत आहे. गेल कंपनीने संपूर्ण एक गॅस पाइपलाइन टाकली आहे. त्यामुळे जेवढे उद्योग या रस्त्याच्या बाजूला आहेत तिथे गॅस पुरवला जाईल. गडचिरोली इथे स्टील उद्योगाला गॅस पुरवला जाईल, अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आणखी वाचा

नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली निवडणुकीची तारीख