मुंबई : बीडमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, पण त्या आंदोलनाशी पक्षाचा संबंध नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेबव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी म्हटलंय. मात्र मनसेने आम्हाला इशारे वगैरे देऊ नये असंही त्यांनी सुनावले आहे. महाराष्ट्राच्या गादीवर लोटांगणवीर बसले आहेत, असे म्हणत  राऊतांनी टीका केली आहे. राऊत  मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 


 संजय राऊत म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही जणांनी सुपारी फेकल्या त्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात . पण त्या आंदोलनाशी शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही.मराठा कार्यकर्त्यांचे आरक्षणासंदर्भातील ते आंदोलन होते.  सध्या महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडा आणि बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे. त्यात  राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केले. त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यात मनसेचे लोकही असू शकतात. कारण मराठा आंदोलन हे पक्षविरहीत आंदोलन आहे. जेव्हा या संदर्भात एक मराठा लाख मराठा असे म्हणते मोठमोठे मोर्चे निघाले.  तेव्हाचे आमचे मंत्री, आमच्याच नाही  तर इतर पक्षांचे नेते सगळे एकत्र होते. आता सुद्धा या आंदोलनामध्ये कदाचीत बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील. परंतु ते सर्वांचे आंदोलन होते


आम्हाला इशारे वगैरे देऊ नका.. राऊतांचा मनसेला इशारा


 राज ठाकरेच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटाला इशारा दिला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्हाला इशारे वगैरे देऊ नका.. ते भाजपला, फडणवीसांना, महाराष्ट्रद्रोह्यांना द्या... मी माझ्या पक्षाची, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भूमिका सांगत आहे. बीडमध्ये हा प्रकार घडला. त्यावेळी आम्ही दिल्लीत होतो. बातमी समोर आल्यानंतर आम्ही लगेच माहिती घेतली. 


महाराष्ट्राच्या गादीवर लोटांगणवीर : संजय राऊत 


राजकारणात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तसेच विरोध करण्याचा देखील अधिकार आहे. विरोध करताना निषेधाच्या पद्धती वेगळ्या असतात.  महाराष्ट्रात सध्या ज्या पद्धतीने वातावरण बिघडवलं जात आहे, भविष्यात सर्वच राजकीय पक्षांनी या विषयावर संयम राखणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले. 


महाराष्ट्रातले राज्यकर्ते जे दिल्लीच्या दारात पायपुसणे : संजय राऊत 


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर  जे बसले आहेत ते लोटांगण घालूनच बसले आहेत. महाराष्ट्राच्या गादीवर सध्या लोटांगणवीर बसले आहेत. आता पर्यंतचे जेवढे मुख्यमंत्री दिल्लीला गेले नसतील तेवढे हे एक मुख्यमंत्री लोटांगण घालण्यासाठी गेले. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत लोंटागण घालायला गेले होते का? पेशव्यांनी दिल्ली जिंकली ते काय लोटांगण घालायला गेले होते का? ठाकरेंनी मोदी, शाहांच्या जुलमी कारभाराशी  झुंज दिली त्याला लोटांगण नाही तर त्याला  स्वाभिमानी लढा म्हणतात. आज महाराष्ट्रातले राज्यकर्ते जे दिल्लीच्या दारात पायपुसणे म्हणून बसले त्याला लोटांगण म्हणतात, असे संजय राऊत म्हणाले.  


फडणवीसांनी  महाराष्ट्राचे राजकारण नासवले : संजय राऊत


परमबीर सिंह हे आरोपी आहे त्यामुळे त्यांच्या बद्दल मला काही बोलयचे नाही.  हा विषय आमच्यासाठी संपला आहे . देवेंद्र फडणवीसांनी  महाराष्ट्राचे राजकारण नासवले आहे, असे संजय राऊत म्हणाले. 


हे ही वाचा :


मोठी बातमी :राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या भिरकावल्या, सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु, ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेचा इशारा