Sachin Kurmi Case : भायखळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी (Sachin Kurmi) यांच्या हत्येच्या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. या हत्येप्रकरणी गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी विधान परिषदेत विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. कुर्मी यांच्या कुटुंबियांनी पोलीस (Police) प्रशासनावर आरोपींना वाचवण्याचा आरोप केल्यानंतर आणि सभागृहात सत्ताधारी व विरोधक दोघांनीही आवाज उठवल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

पंकज भुजबळ यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

या प्रकरणावर विधान परिषदेत पंकज भुजबळ यांनी आवाज उठवताना म्हटलं की, "हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपींची अजून चौकशी झाली नाही. उलट सचिन कुर्मी यांच्या मुलाला कॉलेजमध्ये जाताना धमकावलं गेलं. सीडीआर रिपोर्टही अद्याप तपासला गेला नाही. पोलीस प्रशासन या प्रकरणात कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे." भुजबळ यांनी पुढे SIT कडून चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे उत्तर

यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, "आम्ही आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे आणि प्रकरणात मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. हा प्रकार आर्थिक वादातून घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. उर्वरित आरोपींची नावं समोर आली असली तरी ते अधिकृत आरोपी म्हणून अद्याप नोंदवले गेलेले नाहीत." ते पुढे म्हणाले, "सखोल चौकशी करण्यात येईल. सीडीआर रिपोर्ट आणि इतर तांत्रिक तपासही लावण्यात येईल. कोणालाही सोडणार नाही," असे योगेश कदम यांनी म्हटले.

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या प्रकरणात गंभीर प्रश्न उपस्थित करत सांगितलं, "सचिन कुर्मी यांना जी धमकी देण्यात आली होती. ‘तुला वर पाठवतो’, हे हत्येपूर्वीच घडलं होतं. त्यामध्ये राजकीय शत्रू असल्याचा संशय आहे. तरीही संबंधित आरोपींवर अद्याप कारवाई झाली नाही, कारण त्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यांना फोन गेले होते," असे त्यांनी म्हटले. 

गुन्हेगारांवर कठोर कारवाईचं आश्वासन

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सगळ्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं, "या प्रकरणात कोणालाही वाचवण्यात येणार नाही. यापूर्वी संबंधित लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पुढील तपास SIT मार्फत करून सखोल चौकशी केली जाईल," अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. 

नेमकं प्रकरण काय?

भायखळा येथे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष आणि छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय असलेले सचिन कुर्मी यांची 4 ऑक्टोबर 2024 रोजी धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 16 आरोपी असून पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. 4 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री १२ वाजता सचिन कुर्मी हे भायखळा येथील म्हाडा कॉलनी येथे गेले होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी सचिन कुर्मी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात कुर्मी हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले तेव्हा कुर्मी ही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना पोलिसांनी तातडीने त्यांच्या गाडीतून जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच कुर्मी यांचा मृत्यू झाला होता.

आणखी वाचा

Sachin Kurmi : दादांच्या कार्यकर्त्याची भायखळ्यात हत्या, सचिन कुर्मींच्या हत्येमागचा आका कोण? दक्षिण मुंबईत पोस्टर्स