मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर वरिष्ठ नेते एकमेकांवर थेट टीका करत आहेत. त्यातच, लोकसभा निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा (Baramati) मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच थेट सामना होत असल्याचे दिसून येते. कारण, येथील मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकमेकांविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे, नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही एकमेंकाविरुद्ध भिडत आहेत. सोशल मीडियातूनही दोन्ही पक्षाच्या समर्थकांची तू तू मै मै दिसून येते. त्यात, आमदार अमोल मिटकरी अजित पवारांच्याा बाजूने खिंड लढवत आहेत. तर, आमदार रोहित पवार शरद पवार व आत्या सुप्रिया यांच्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. त्याच अनुषंगाने रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काही फोटो ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला. आता, त्यास अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

बारामतील लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं असून बारमतीमध्ये रविवारी दोन्ही पक्षाच्या सांगता सभा पार पडल्या. या सभांमधून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध फटकेबाजी केली. यावेळी, आमदार रोहित पवार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांचा दाखल देत भरसभेत रोहित पवारांनी हुंदका देत स्वत:ला आवरलं. मात्र, रोहित पवारांच्या या प्रसंगाची खिल्ली उडवत अजित पवारांनीही भरसभेत रडण्याचं नाटक करुन दाखवलं. त्यामुळे, रोहित पवार सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच, आज रोहित पवार यांनी काही फोटो शेअर करत अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. 

रोहित पवारांची टीका

स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे ‘विचार’ घेऊन राजकारण करतो, असं सांगणाऱ्या अजितदादांना निवडणुकीत मात्र खून, खंडणी, धमकी, अपहरण, मोक्का यांसारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची आणि टोळी प्रमुखांची मदत घ्यावी लागतेय. व्वा दादा व्वा!सामान्य लोकं प्रचार करण्याऐवजी गुंडच अजितदादांचा खुलेआम प्रचार करतायेत आणि या प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी उद्याचा मतदानाचा दिवस सर्वांत महत्त्वाचा आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. आता, रोहित यांच्या ट्विटला आमदार अमोल मिटकरी यांनीही फोटो शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे.

अमोल मिटकरींचा पलटवार

बालिश सोशल मीडियावर ज्या व्यक्तींचे फोटो टाकुन दादांची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय तीच व्यक्ती या पठ्ठयाचाही 2019 मध्ये प्रचार करत विविध कार्यक्रम घेत होती. मात्र, याच्या उन्मत्त व अहंकारी स्वभावामुळे सोयीने विसर पडून याचे मानसिक संतुलन बिघडले हे नक्की, अशा शब्दात आमदार मिटकरी यांनी रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे, दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत असल्याचे दिसून येते. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमोल मिटकरी सातत्याने रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. बाल मित्र मंडळाचा अध्यक्ष असे संबोधत सोशल मीडियातून रोहित पवारांची खिल्ली उडवताना दिसून येतात