Rohit Pawar On Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज (29 ऑगस्ट) सकाळी मुंबईत दाखल झाले आहेत. शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल (Manoj Jarange Mumbai Morcha) झालेत. मनोज जरांगे मुंबईत पोहोचताच सीएसएमटी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मनोज जरांगे आझाद मैदानात आंदोलन करणार आहे. आझाद मैदान पूर्णपणे हाऊसफुल्ल झालं आहे. आझाद मैदानात आता उभं राहायला जागा उरलेली नाही. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
रोहित पवार एक्सवर पोस्ट करत काय म्हणाले?
आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे. परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल.मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात, असं रोहित पवार म्हणाले. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात, असं रोहित पवारांनी सांगितले.
आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सुविधा नाही- रोहित पवार
आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंना एकाच दिवसाची परवानगी-
आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना एका वेळी एकाच दिवसाची परवानगी मिळालीय. शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आज एकच दिवस जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करावं लागणार आहे. एका दिवसात आंदोलन कसं करणार, असा सवाल जरांगेंनी सरकारला केलाय. आणखी काही दिवसांची परवानगी मागणार असल्याचं सांगितलं जातंय. पण तशी परवानगी मिळाली तरी परवा शनिवार असल्यानं नियमानुसार जरांगेंना आजनंतर सलग आंदोलन करता येणार नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी जरांगेंचा मुक्काम कुठे असणार हा प्रश्न आहे.