Rohit Pawar on Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकताच गुपचूपपणे दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी स्वतःला आयकर विभागाची नोटीस प्राप्त झाल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही अशाच स्वरूपाची नोटीस मिळाल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना सुरुवात झाली आहे. आता हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
शिंदे कुटुंबात काही लोकांना आयकर विभागाची नोटीस
रोहित पवार म्हणाले की, शिंदे कुटुंबात काही लोकांना आयकर विभागाने नोटीस पाठवल्या आहेत. त्यांना नोटीस पाठवल्याने आतल्या आत काही कुरघोड्या होतायत का? यासाठी ते दिल्लीला गेले असावे. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी भाजपने हे केलंय का? आयकर नोटीसेसमध्ये माघार घेऊ. मात्र, पालिका निवडणुकीत तडजोड करा. यासाठी भाजपचा हा प्रयत्न असेल, असा दावा त्यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न
रोहित पवार पुढे म्हणाले की, भाजपच्या अनेक नेत्यांकडे सुद्धा जमिनीचे, आयकर विभागाचे विषय आहेत. त्यांच्याकडे नोटीस जात नाहीत. भाजपचा दुसरा मित्र पक्ष अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे आयकर विभागाची नोटीस जात नाही. पण, एकनाथ शिंदे यांच्याकडे जाते. मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे हे चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले. आता रोहित पवार यांच्या वक्तव्यावर भाजप काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार केसरीसारखे वागत असेल तर ते चुकीचं
आकाशवाणी आमदार निवासात शिळे जेवण दिल्याने कँटिनच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्याला संबंधित कृतीचा कोणताही पश्चाताप नसल्याचे वक्तव्य केले आहे. याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, मी सगळ्याच आमदारांना विनंती करतो. आमदार केसरीसारखे वागत असेल तर ते चुकीचं आहे. लहान मुलांपर्यंत हे व्हीडिओ जातात आणि प्रतिमा खराब होते, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा