Rohit Pawar Meets Ajit Pawar : अहमदनगरमधील कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. विधीमंडळातील अजित पवार यांच्या दालनात जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मतदारसंघातील वेगवेगळ्या मुद्द्यांसदर्भात ही भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. "आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही," अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी भेटीनंतर दिली.


एमआयडीसीच्या मुद्द्यावर रोहित पवार जोरदार टीका केली होती. याबाबत त्यांनी एक दिवसाचं आंदोलन देखील केलं होतं. कोणत्याही प्रकारे न्याय मिळत नसल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर या संदर्भात बैठक लावण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कदाचित प्राथमिक भेट ही उपमुख्यमंत्र्यांसोबत असावी असं म्हटलं जात आहे.


राजकीय मतभेद आहेत पण, कौटुंबिक संबंधात ते येऊ नयेत, याची आम्ही काळजी घेतो


भेटीनंतर रोहित पवार म्हणाले की, "स्पर्धा परीक्षेसाठी 1000 रुपये घेतले जातात, याबाबत उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये 600 रुपये भरले की कितीही वेळा परीक्षा देता येते. तशाच पद्धतीने आपल्याकडे राबवावी, यासाठी दादांशी चर्चा केली. MPSC साठी पाठपुरावा घेतला, लक्ष घालण्याची विनंती केली. पिक विमा भरताना इंटरनेट डाऊन असल्याने अनेकांना विमा भरता आला नाही, त्यात मुदत वाढवण्याची मागणी केली. या सरकारमध्ये एकमेव अजित दादा असे आहेत. जे काम मार्गी लावू शकतात. आम्ही एकत्र जेवण केलं. राजकीय मतभेद आहेत… पण, कौटुंबिक संबंधात ते येऊ नयेत, याची आम्ही काळजी घेतो. या भेटीत आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही."


अजित दादा मुख्यमंत्री झाले तर पुतण्या म्हणून स्वागत करेन, पण... रोहित पवार  


दुसरीकडे अजित पवार मुख्यमंत्री झाले तर पुतण्या म्हणून मी स्वागत करेन, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली होती. पण ज्या विचारांच्या आम्ही विरोधात आहोत त्यांचे मुख्यमंत्री झाले तर नागरिक म्हणून वाईट वाटेल. शिंदे गटाला भीती वाटते की अजितदादा मुख्यमंत्री होतील आणि दादांच्या लोकांना ते मुख्यमंत्री होतील असं वाटतं. भाजप अशा चर्चा घडवत तर नाही ना अशीही शंका आहे, असं रोहित पवार म्हणाले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये वाद दाखवून कुठेतरी भाजपला त्यांना मुख्यमंत्री करायचं नाही ना? असं वाटतंय, असंही ते म्हणाले.


हेही वाचा


Exam Fees: शंभर रुपयात कलेक्टर होतात, पण तलाठी होण्यासाठी 1000 रुपये फी; रोहित पवारांच्या भाषणाने स्पर्धा परीक्षा शुल्काचा मुद्दा ऐरणीवर