मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आज पुन्हा दुसऱ्यांदा ईडी चौकशी होणार आहे. कथित बारामती अॅग्रो घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी 24 जानेवारीलाही रोहित पवारांची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे रोहित पवारांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) दिवसभर पक्ष कार्यालयात बसणार आहेत. तर, दुसरीकडे राज्यभरातील शरद पवार गटाचे कार्यकर्तेही देखील या कारवाईमुळे आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.
रोहित पवार दुसऱ्यांदा ईडी चौकशीसाठी जाणार आहेत. कफ परेडे परिसरात असणाऱ्या हॉटेल ताज प्रेसिडेंट येथून काही वेळात रोहित पवार निघणार आहे. यावेळी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, रोहित पवारांच्या चौकशी दरम्यान शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार दिवसभर पक्ष कार्यालयात बसणार आहेत. तर, पहिल्या चौकशीच्या वेळी स्वतः शरद पवार दिवसभर पक्ष कार्यालयात बसून होते. विशेष म्हणजे ईडी कार्यालय आणि शरद पवार गटाचे कार्यालय जवळजवळ आहे.
बारामती तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन...
आमदार रोहित पवार यांची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. रोहित पवारांच्या समर्थनार्थ बारामती तहसीलदार कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच, तहसीलदारांना निवेदन देऊन या कारवाईचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
नागपुरात शरद पवार गटाचे आंदोलन...
ईडीकडून रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेध करण्यासाठी आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. नागपूरच्या व्हेरायटी चौकावर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर आणि ग्रामीणचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महागाई, बेरोजगारी आणि इतर अपयशांच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी महायुतीचे सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातही कार्यकर्ते आक्रमक...
आमदार रोहित पवार यांची सुरू असलेल्या ईडी कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला असून, शासनाला सुबुद्धी मिळावी यासाठी नामदेव पायरी येथे विठ्ठलाची आरती करण्यात आली. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला. सरकार हमसे डरती है, इडी को आगे करती है, लोकशाहीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
रोहित पवार यांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचे पवनराजे राळेभात यांचा भाजपत प्रवेश