मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाला लागला असून 288 पैकी 237 जागा जिंकत महायुतीने निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं आहे. तर, केवळ 49 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. या 49 जागांपैकी शरद पवारांच्या (sharad pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा जिंकता आल्या असून तासगाव-कवठेमहंकाळ मतदारसंघातून माजी मंत्री आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit Patil) विजयी झाले आहेत. राज्याचं लक्ष लागून असलेल्या तासगाव विधानसभा मतदारसंघात रोहित पाटलांनी 26,577 मतांनी विजय मिळवला, त्यांना 1,26,478 मतं मिळाली तर भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांना 99,901 मतं मिळाली. या विजयानंतर पहिल्यांच ते एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमासाठी आले असता विविध विषयांवर त्यांनी दिलखुलास चर्चा केली. निवडणुकांतील अनुभव, आबांच्या आठवणी, सध्याचं राजकारण, दोन राष्ट्रवादी यावरही भाष्य केलं. तसेच, देशातील सर्वात तरुण आमदार, सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून मी विजयी झाल्याचं आनंद असल्याचंही त्यांनी म्हटलं.
रोहित पाटील यांनी मलाही आमदार झाल्याचं तेव्हाच खरं वाटतं जेव्हा कोणी आमदार असं म्हणतं, माझे काही उत्तर भारतीय मित्र आहेत, त्यांनीही मला फोन करुन अभिनंदन करताना म्हटलं, भाई तू विधायक बन गया... तेव्हाच मला मी आमदार झालोय हे खरं वाटलं, असे रोहित पाटील यांनी म्हटलं. तसेच, मी महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार आहे, पण माझ्या काही मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कदाचित मी देशातील सर्वात तरुण आमदार आहे. यापूर्वी झिशान सिद्दिकी हे 26 व्या वर्षी आमदार झालेले तरुण आमदार होते. त्यानंतर, तेलंगणातील रोहीत नावाचे एक आमदार आहेत, ज्यांचं वय 9,700 दिवस एवढं होतं. 9,700 दिवसांचा आमदार योगायोगाने तो रोहित होता. आता, 9400 दिवसांचा देशातील सर्वात तरुण आमदार मी आहे, जी माहिती मला आहे. 25 वर्षे 4 महिन्यांचा असताना मी आमदार झालो, असेही रोहित पाटील यांनी म्हटलं.
अजित पवारांच्या वक्तव्याने दु:ख झालं
मी राजकारणात येण्यापूर्वी राजकारणात येण्यासाठी काय करायचं, याआधी काय नाही करायचं हे मला काकांनी सांगितलं होतं, असे म्हणत आबांच्यानंतर काका आणि आजीच्या संस्कारातच, विचारातूच आपण अनेक निर्णय घेतल्याचं रोहित पाटील यांनी म्हटलं. रोहित पाटील यांनी निवडणुकीतील अनेक किस्से, मतदारसंघात विरोधकांकडून झालेलं खालच्या स्तरावरील राजकारण आणि अजित पवारांनी केलेलं वक्तव्य यावरही भाष्य केलं. अजित पवारांनी जे वक्तव्य केलं ते ऐकून दु:ख झालं. ऐन निवडणुकीच्या काळात, तेही निवडणूक प्रचाराच्या भाषणात अजित दादांकडून अशा पद्धतीची टीका झाली, याचं दु:ख वाटलं. मात्र, अजित पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या टीकेवर मी काय उत्तर देणार, असे रोहित पाटील यांनी म्हटलं.
वडिल, आईनंतर रोहित पवार बनले आमदार
तासगाव मतदारसंघात दिवंगत नेते आर.आर.पाटील हे आमदार बनले होते. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या दोन वेळा येथून आमदार राहिल्या. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या मुलाने म्हणजे रोहित पाटलांनी वयाची पंचविशी पूर्ण केल्यानंतर आमदारकीची तयारी सुरू केली. स्वतः शरद पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पाठबळ कसे मिळेल यासाठी लक्ष घातलं. या निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजयकाका पाटील यांचा पराभव केला.